Supriya Sule To Meet Amit Shah: बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातलं राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लावून धरली आहे. विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत सातत्याने विचारणा केली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.
बीड मधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंकी, अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या ५० दिवसांमध्ये अनेक आरोप केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा, अशी मागणी आणि अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा ५१ दिवसांपासून बेपत्ता आहे. तो नेमका कुठे आहे? तो असा गायब कसा होऊ शकतो? पोलिसांना त्याचा शोध का लागत नाही? एवढा वेळ का लागत आहे? पोलिसांची यंत्रणा काय करत आहे? असे अनेक सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत.
सुप्रिया सुळे घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन असले तरी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे महाविकास आघाडीचे सर्व खासदार मोठ्या ताकदीने मांडणार आहोत. भाजपा आणि शिंदे गटाच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार आहे. सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संसदेत बीड, परभणीच्या घटनांविषयी बोलले पाहिजे. या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना या घटनेची माहिती देणार आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
दरम्यान, बीड प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणाले की, ही कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.