NCP SP Group MP Supriya Sule: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. तर भाजपा नेते सुरेश धस हेही यावरून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी मोर्चे, आंदोलने काढण्यात आली. यात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे हेदेखील उपस्थित राहिले. यासंदर्भात सर्वपक्षीयांनी राज्यपालांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदनही सादर केले. यातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना द्यावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. तसेच मंत्रिमंडळ बैठकीलाही धनंजय मुंडे उपस्थित राहिले. या संदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशमुख कुटुंबीय आणि त्यांच्या भावना, अश्रू पाहून अस्वस्थ वाटते. या सरकारने थोडासा तरी संवेदनशीलपणा दाखवावा. मुख्यमंत्री म्हणाले आहेत आम्ही कोणाला सोडणार नाही. मग, मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावे लागेल. राजकारण बाजूला ठेवून माणुसकी दाखवून न्याय मिळाला पाहिजे. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले, तर आशेच किरण निर्माण झाला आहे. आता काय निर्णय मुख्यमंत्री घेतात ते बघू. याआधी ज्या वेळेस आरोप झाले, तेव्हा नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेतला आहे. आता राजीनामा मागितला आहे. पण तेच घेत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पालकमंत्रीपदाबाबत एवढी चर्चा आम्ही कधीच ऐकली नाही
राजकारण वेगळे आणि राजकीय जबाबदारी वेगळी. कुटुंब उंबऱ्याच्या आत असते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत अधिक काही बोलणे सुप्रिया सुळे यांनी टाळले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडून सरकारमध्ये कुणीच सक्रीय दिसत नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. सगळ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तसेच पालकमंत्रीपदात नेमके काय आहे, त्याच्यासाठी एवढा वेळ का जात आहे. पालकमंत्रीपदाबाबत एवढी चर्चा आम्ही कधीच ऐकली नाही. एवढी रस्सीखेच का केली जाते. एवढे गूढ त्यात काय आहे, ते मला माहिती नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
दरम्यान, सरकारने सोयाबीन, कपाशीला हमीभाव देऊ असा शब्द दिला होता. सरसकट कर्जमाफी देऊ असेही सांगितले होते. राज्याने विश्वास ठेवून मतदान केले आणि त्यांना सत्ता मिळाल्यानंतर आमची एकच इच्छा आहे सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.