LPG Gas Price Hike: पेट्रोल, डिझेल करवाढीनंतर सामान्यांना सोमवारी आणखी एक झटका बसला. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ जाहीर केली. त्यामुळे आता सामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. देशभरातून या निर्णयाविरोधात केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. गॅस दरवाढीचा भडका उडू नये म्हणून मोदी सरकारचं देशवासियांसाठी खुलं पत्र लिहील्याचे म्हणत शरद पवार गटाने केंद्र सरकारला टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घरगुती वापराच्या गॅसच्या दरवाढीवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सडकून टीका केली. शरद पवार गटाने गॅस दरवाढीवरील मोदी सरकारचे एक खुले पत्र सोशल मीडियावर शेअर करत 'भाव बढेंगे तो ही हम बचेंगे' अशी टीका केलीय. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची दरवाढ लागू करण्यात आल्यानंतर शरद पवार गटाने टोला लगावला आहे.
पत्रात काय म्हटलं?
"प्रिय देशवासीयांनो, तुमच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकदा सत्तेची ऊब अनुभवत आहोत. पण आम्ही सत्ताधीश होण्यासाठी केलेल्या करामतीची किंमत चुकवण्याची वेळ आता आली आहे. म्हणूनच आम्ही पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची सौम्य दरवाढ करतोय. तर आता तुम्हाला महागईची धग सहन करावी लागेल. तर कृपया निमूटपणे सहन करा. वाईट वाटून घेऊ नका. ‘भाव बढेंगे तो ही हम बचेंगे’, हे तुम्हाला एव्हाना कळालं असेलच. चिंता करू नका… पुढील निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा गॅस दर कमी करू व सामान्य माणसाच्या हितासाठी तुमचं मत मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, तुमचं लाडकं, (महागाईच्या गोदीत बसलेलं) मोदी सरकार,” असं या पत्रामध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्राच्या निर्णयानंतर ८ एप्रिलपासून गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपये महाग झाल्याचं सरकारने जाहीर केलं. उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत ५०३ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ५५३ रुपयांना मिळणार आहे. एक सिलिंडर ८०३ रुपयांवरुन ८५३ रुपये इतका झाला आहे.