महाड : महाड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि मनसे एकत्रितपणे सामोरे जाणार असून नगराध्यक्षपदासह सर्व सतरा जागांवर आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याची घोषणा बुधवारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेवून केली. या निवडणुकीसाठी महाड शहर नगर विकास आघाडीची स्थापना केली जाणार असून आघाडीचे चिन्ह निशाणी म्हणून वापरणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. शहरात घनकचऱ्यासह अनेक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचा आरोप कुमार मेहता यांनी या पत्रकार परिषदेत केला. आरोग्य, मुबलक पाणीपुरवठा करण्यातही सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मेहता यांनी यावेळी केला. शहरात पर्यटनाला चालना देण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस पक्षाकडून कुठलेही प्रयत्न झाले नसल्याने विकास खुंटत आहे, असेही विजय सावंत यांनी सांगितले. या तीन पक्षांसह शहरातील सेवाभावी संघटनांनाही आपल्या आघाडीत सहभागी करून घेणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय सावंत, शेकापचे तालुका चिटणीस कुमारभाई मेहता, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद पवार, शहराध्यक्ष चेतन उत्तेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राकेश शहा, चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रघुवीर देशमुख, धनंजय देशमुख आदि पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)शहरात अनेक समस्या>शहराचे नियोजनबद्ध काम होत नसल्याचे शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने नगरविकास आघाडीच्या माध्यमातून आपण शहर विकासाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करू, अशी ग्वाही धनंजय देशमुख यांनी यावेळी दिली.
महाडमध्ये राष्ट्रवादी- शेकाप-मनसेची आघाडी
By admin | Updated: October 20, 2016 03:14 IST