एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी - मोदी
By Admin | Updated: October 12, 2014 19:31 IST2014-10-12T18:44:06+5:302014-10-12T19:31:35+5:30
एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.
एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी - मोदी
ऑनलाइन लोकमत
लोहा/ ठाणे, दि. १२ - एनसीपी म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. त्यांची निशाणी असलेल्या घडाळ्याचा '१० वर्षात १० पटीने भ्रष्टाचारात वाढ' हाच अर्थ आहे असा टोलाही मोदींनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी लोहा, ठाणे, पंढरपूर तुळजापूर येथे प्रचारसभा घेतली. या सभांमध्ये मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राज्यातील अनागोंदी कारभार माहित असूनही काँग्रेसने काहीच केले नाही. त्यांनी फक्त मुख्यमंत्री बदलून शिफ्ट सिस्टम आणली असा टोला नरेंद्र मोदींनी ठाण्यातील सभेत लगावला. मुंबईवर दहशतवादी हल्ले होत असताना राज्याचे गृहमंत्री अशा छोट्या मोठ्य घटना घडतातच असे विधान कसे करु शकतात ? आता राज्यातील जनतेनेही १५ ऑक्टोंबरला भाजपला मत देऊन छोटीमोठी गोष्ट घडवावी असे मोदींनी सांगितले.
राष्ट्रवादी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यातील भ्रष्टाचार १५ पटीने वाढेल असे सांगत जनतेने संधी दिल्यास आम्ही त्यांचे भाग्य बदलून दाखवू. भाजपला बहुमताने निवडून दिल्यास पाच वर्षानंतर सरकारच्या कामकाजाचा हिशोब तुम्हाला देऊ असेही मोदींनी नमूद केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या भ्रष्टाचारी पक्षांना महाराष्ट्रातून हद्दपार केल्यावरच राज्याचे भले होईल असे मोदींनी म्हटले आहे.