केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप विरोधकांनी केला हे. आज संसदेत आज काँग्रेससह विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. शाह यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस खासदारांनी केली. दरम्यान, आज राज्यातही विरोधी पक्षांनी अमित शाह यांचा निषेध व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सामिल असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनीही शाह यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे.
भाजप खासदार प्रताप सारंगी लोकसभेत पडले, डोक्याला दुखापत; राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप
नागपुरात पत्रकारांसोबत संवाद साधताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, अमित शाह यांनी सभागृहात केलेले भाषण ऐकलं. त्यांच्या विधानाचे कोणीही समर्थन करु शकत नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर देशाची अस्मिता आहेत, असं स्पष्टच आमदार अमोल मिटकरी म्हणाले. पण शाह यांनी भाषण करत असताना काँग्रेसच्या मनात बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत काय धारणा राहिली? दोन ठिकाणी कसा पराभव केला? हेही त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही एकच लाईन पुढ आली.त्या लाईनचा निषेध आहेच, बाबासाहेब हे सर्वाच्च आहेतच. त्यांची बरोबरी कोणच करु शकत नाही, असंही मिटकरी म्हणाले.
यावेळी आमदार मिटकरी यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. आमदार अमोल मिटकरी म्हणाले, काँग्रेस आता या गोष्टीचे राजकारण करत आहे. काँग्रेस हे जळत घर आहे हे खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. यांना आता विधामंडळाच्या अधिवेशनात काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून हे आता निळ्या टोप्या, बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेऊन आले आहेत. जी लोक निळ्या टोप्या घालून गेली आहेत त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांच्या घरातील देवघराच्या बाजूला डॉ. बाबासाहेबन आंबेडकर यांचा फोटो लावून दाखवावा, आणि तो फोटो त्यांनी ट्विटरवर टाकावा,असं आवाहनही मिटकरी यांनी विरोधकांना केले.