सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या घरात गळफास घेत पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सुरेश पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पाटील यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे.
मागील ३०-४० वर्षापासून सुरेश पाटील सांगलीच्या राजकारणात सक्रीय आहेत. नगरसेवक ते महापौर आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही पाटील यांनी काम केले आहे. सांगलीच्या रुग्णालयात सुरेश पाटील यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. सोमवारी सकाळी नेमिनाथनगर येथील निवासस्थानी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पत्नी व शेजारील नागरिकांनी तत्काळ धामणीजवळील मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवले होते.
सुरेश पाटील हे १९९९ ते २००१ या काळात सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे महापौर होते. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षपद त्यांनी काही वर्षे भूषवले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रात त्यांची स्वतंत्र ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटांत विभागणी झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात दाखल झाले. गेल्या काही दिवसांपासून ते राजकारण, समाजकारण व अन्य क्षेत्रापासून दूर आहेत.
नेमके कारण काय?
माजी महापौर सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील कुटुंबीयांना गेल्या काही महिन्यांत व्यवसायात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते.