Maharashtra Politics: “हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:01 PM2023-01-14T12:01:49+5:302023-01-14T12:03:20+5:30

Maharashtra News: नाशिक पदवीधर निवडणूक उमेदवारीत राजकीय खेळी कमी व सत्तेचा गैरवापर जास्त आहे, अशी टीका अजित पवारांनी केली.

ncp leader ajit pawar reaction over congress candidate politics in nashik graduate election for vidhan parishad | Maharashtra Politics: “हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात”

Maharashtra Politics: “हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की पायलीस पन्नास चाणक्य निर्माण होतात”

Next

Maharashtra Politics: आताच्या घडीला नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये घडलेल्या नाट्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. ऐनवेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी माघार घेत स्वत:च्या मुलाला अपक्ष उमेदवार म्हणून उभे केले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना काही गौप्यस्फोट करत, टीकाही केली आहे. 

नाशिकमध्ये जे घडले त्याचे श्रेय भाजप घेत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्यगिरीमुळे नाशिकमध्ये हे घडले, असे सांगितले जाते. हातात सत्ता व केंद्रीय तपास यंत्रणा असली की, असे चाणक्य पायलीस पन्नास निर्माण होतात. यात राजकीय खेळी कमी व सत्तेचा गैरवापर जास्त आहे. महाविकास आघाडीतील ढिलाई भाजपच्या पथ्यावर पडली, असेच म्हणावे लागेल. पाच जागी निवडणुका होत आहेत. त्याबाबत एकत्र बसून काही साधकबाधक चर्चा झाली काय? काही नियोजन, बांधणी ठरली काय? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असेच द्यावे लागेल असे सांगत अजित पवार यांनी शिवसेनेने काँग्रेसबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 

कोण कुठे जाणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ठाकरे गटात येण्याची ऑफर देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशावर बोलताना अजित पवार म्हणाले की, कोण कुठे जाणार हे सांगायला मी ज्योतिषी नाही. मला हे बघायचेही कारण नाही. मी माझ्या पक्षाचे काम करणारा कार्यकर्ता आहे. कुणी कुठल्या पक्षात जावे हा वैयक्तिक अधिकार आहे. कुठल्याही पक्षाचे काम करताना विश्वासार्ह महत्त्वाचा आहे. विश्वास गमावू नये याची काळजी घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. 

दरम्यान, एकनाथ शिंदे आमच्याकडे होते तेव्हा चांगले होते. आता जरा काम बिघडले. हे बघा आता काम बिघडले म्हणजे थेट हेडलाइनच होणार, अजित पवार टीका करताना घसरले असेही म्हटले जाणार. पण महाविकास आघाडी सरकार असताना चाकणमध्ये वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येणार होता. दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर काही बोलायला तयार नाही, या शब्दांत अजित पवार यांनी हल्लाबोल केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: ncp leader ajit pawar reaction over congress candidate politics in nashik graduate election for vidhan parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.