मनसेसह राष्ट्रवादीला पक्षांतराचा ‘दे धक्का’
By Admin | Updated: April 30, 2016 02:09 IST2016-04-30T02:09:24+5:302016-04-30T02:09:24+5:30
मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच राजकीय पक्षांमधील अंतर्गत कुरघोडी वाढत आहेत.

मनसेसह राष्ट्रवादीला पक्षांतराचा ‘दे धक्का’
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असतानाच राजकीय पक्षांमधील अंतर्गत कुरघोडी वाढत आहेत. अनेकांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. तर नाराजांकडून बाहेरचा रस्ता पत्करला जात आहे. मनसे आणि राष्ट्रवादीमधील खदखद बाहेर येत आहे. याचाच टे्रलर म्हणून की काय शुक्रवारी मनसे, राष्ट्रवादीसह एका अपक्ष नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अनेक नाराज नगरसेवक पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. मनसेचे तब्बल बारा नाराज नगरसेवक ‘शिवसेने’च्या वाटेवर असल्याची माहिती होती. शुक्रवारी मनसेचे चांदिवली विभागातील वॉर्ड क्रमांक १५१ चे नगरसेवक ईश्वर तायडे, वॉर्ड क्रमांक १५० च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सविता पवार आणि वॉर्ड क्रमांक १६४ चे नगरसेवक विजय तांडेल यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
दरम्यान, ईश्वर तायडे हे मनसेचे चांदिवली विभागाचे अध्यक्ष होते. पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आमदारकीही लढवली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर तायडे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. तायडे यांचा शिवसेनेतील प्रवेश मनसेसाठी धक्का मानला जात आहे. सविता पवार यांच्या सेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत राजकारण देखील उफाळून आले आहे.
मनसेचे नगरसेवक दिलीप लांडे हेदेखील शिवसेनेत जाणार असल्याचे ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. परंतु लांडे यांनी हे फेटाळून लावले आहे. ‘मी आहे तेथे समाधानी आहे आणि मी राज यांचा निष्ठावान कार्यकर्ता’ असे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)