NCP Ajit Pawar Group: विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या पाच जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेत महायुतीचे प्रचंड बहुमत लक्षात घेता पाचही जागा त्यांनाच मिळतील असे चित्र आहे. या पाच जणांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ज्या दिवशी संपणार होता त्या दिवसापर्यंतच त्यांच्या जागी निवडून येणाऱ्या आमदारांचा कार्यकाळ असेल. परंतु, आता यावरून महायुतीत मानापमान नाट्य रंगताना दिसू शकते, असा कयास आहे. जागा थोड्या असल्या तरी इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीत उमेदवारी देण्यावरून पक्ष नेतृत्वांचा कस लागणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत अजित पवारांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली आहे.
पाच सदस्य नोव्हेंबरची विधानसभा निवडणूक लढले व विजयी झाल्याने या जागा रिक्त झाल्या. अजित पवार गटाकडून ज्यांना आमदारकीची संधी मिळेल त्यांचा कार्यकाळ हा सव्वापाच वर्षांचा असेल. शिंदेसेनेकडून संधी मिळेल त्यांचा कार्यकाळ हा सव्वातीन वर्षांचा असेल. भाजपकडून ज्यांना आमदारकी मिळेल त्यांचा कार्यकाळ हा १३ महिन्यांचाच असेल. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्या फळीतील एक-दोन जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे नेते नाना काटे यांनी विधान परिषदेचा शब्द दिला होता, अशी आठवण करून दिली आहे.
काय म्हणाले नाना काटे?
अजित पवार यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, तुला येऊन भेटतो. त्यानुसार अजित पवार घरी आले. विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा जेव्हा भाजपाला गेली होती. अजित पवारांनी म्हटले होते की, आपण महायुतीत आहोत. त्यामुळे आता तू माघार घे. आपण जे काही असेल ते पुढे पाहू. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचे दोन आमदार निवडून आले. दोन आमदार विधान परिषदेवर घेतले. त्यामुळे या शहरांमध्ये भाजपाचेच चार आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती पाहता ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक आमदार पाहिजे. आम्ही सर्व पक्षाचे नगरसेवक आणि नेत्यांनी माझ्यासाठी सहीची मोहीम राबवली. आता अधिवेशन सुरू असल्याने अजित पवारांची भेट होत नाही. अजित पवारांना निरोप दिला आहे. आम्ही सर्व जण निवेदन घेऊन अजित पवार यांना भेटणार आहोत, असे नाना काटे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी शंकर जगताप यांच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता आणि सांगितले की, आता तुम्ही आमच्यासाठी माघार घ्यावी. नक्कीच आम्ही भविष्यात कुठे तरी कामी येऊ. तो दिवस आणि तो क्षण आता आलेला आहे, ते मदत करतील, अशी अपेक्षा आहे. महायुती धर्म पाळून काम केले आहे. आता त्यांनी कसा धर्म पळायचा ते त्यांनी ठरवावे. विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या विधान परिषदेमध्ये एक जागा अजित पवार गटाला मिळणार आहे, त्या जागेवरती उमेदवारी मिळावी अशी नाना काटे यांची इच्छा आहे.