नईमची कोलकाता पोलिसांना तुरी
By Admin | Updated: August 26, 2014 03:55 IST2014-08-26T03:55:53+5:302014-08-26T03:55:53+5:30
लष्कर ए तोयबाचा संशयित अतिरेकी व औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल नईम शेख उर्फ समीर काल कोलकाता पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला.

नईमची कोलकाता पोलिसांना तुरी
मुुंबइ : लष्कर ए तोयबाचा संशयित अतिरेकी व औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल नईम शेख उर्फ समीर काल कोलकाता पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. कोलकाता पोलीस नईमला घेऊन मुंबईच्या वाटेवर होते. रेल्वे प्रवासात छत्तीसगढ परिसरात नईमने पोलिसांच्या हातावर तुरी दिली.
दरम्यान, लष्करचे प्रमुख अतिरेकी झियाबुद्दीन अन्सारी उर्फ अबू जुंदाल, फैयाज कागजी यांच्या संपर्कात असलेल्या आणि भारताविरोधी कारवायांसाठी बांगलादेशात बेस तयार केलेल्या नईमचे पसार होणे देशातील सुरक्षा यंत्रणांसाठी धक्का मानला जात आहे. तूर्तास राज्य दहशतवादविरोधी पथकासह (एटीएस) औरंगाबाद पोलीस आणि अन्य पोलीस यंत्रणांनी नईमचा शोध सुरू केला आहे.
नईम मूळचा औरंगाबादचा. त्यामुळे त्याच्या पलायनानंतर स्थानिक पोलीस आणि एटीएसने औरंगाबाद रडारवर घेतले. नईमचे नातेवाईक, मित्र परिवारावर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असेल. शिवाय भारत-बांगलादेश सीमेवर त्या त्या राज्यांचे पोलीस आणि सीमा सुरक्षा बलाच्या जवानांना सतर्क करण्यात आल्याची माहिती मिळते.
लष्करच्या अतिरेक्यांनी २००६ साली दहशतवादी कारवायांसाठी शस्त्रसाठ्याची तस्करी केली. हा साठा औरंगाबादेत आणला. एटीएस व स्थानिक पोलिसांनी लागोपाठ दोन कारवाया करून हा शस्त्रसाठा पकडला. त्यात १६ एके ४७ रायफल, ६२ मॅगझीन, ३२०० जिवंत काडतुसे आणि ४३ किलो आरडीएक्स होते. या कारवायांमध्ये दोन जीपही जप्त केल्या होत्या. पोलिसांनी नईमसह एकूण २१ आरोपींना या प्रकरणी गजाआड केले. पोलिसांच्या आरोपानुसार नईमने बांगलादेशात आपला तळ तयार केला होता. पोलिसांची धरपकड सुरू झाल्यानंतर शस्त्रसाठ्यात सहभागी असलेल्या अतिरेक्यांना त्याने बांगलादेशात आसरा आणि सर्वतोपरी सहकार्य केले होते. पुढे वर्षभराने भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफने त्याला पकडले व मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
लष्करचा प्रमुख अतिरेकी फैयाज कागजीने नईमला संघटनेत सहभागी करून घेतले. तर २००६च्या शस्त्र तस्करीत नईम जुंदालच्या संपर्कात होता. जुंदाल या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे. (प्रतिनिधी)