गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद
By Admin | Updated: May 4, 2017 11:46 IST2017-05-04T07:43:08+5:302017-05-04T11:46:39+5:30
सुकमा नक्षलवादी हल्ल्याच्या आठवणी अद्यापही ताज्या असताना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य करत हल्ला केला आहे

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात 1 जवान शहीद
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 4 - नक्षलवादी हल्ल्यात सी-60 कमांडोचा एक जवान शहीद झाला आहे. नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणत सी-60 कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी उडवून दिली. सी-६० कमांडोची एक टीम परिसरातून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यानंतर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत सी-६० कमांडोचा एक जवान शहीद झाला आहे. रमेश तेलामी असं शहीद कमांडोचं नाव आहे.
सी-60 कमांडोंचं पथक गस्तीवर असतानाच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या मदतीने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवली. या स्फोटात 12 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. सी-60 फोर्स हे महाराष्ट्र पोलिसांचं नक्षलवादविरोधी विशेष दल आहे. सुकमा नक्षलवादी हल्ल्याच्या आठवणी अद्यापही ताज्या असताना नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य करत हल्ला केला आहे.
#UPDATE Maharashtra: 1 policeman dead, number of injured policemen rises to 19, in yesterday's landmine blast by Naxals in Gadchiroli pic.twitter.com/xY2d29MFnE
— ANI (@ANI_news) May 4, 2017
याआधी बुधवारी सकाळी भामरागड उपविभागातील कोपर्शी व पुलनार जंगल परिसरात विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांसमवेत उडालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान व दोन पोलीस किरकोळ जखमी झाले होते. सीआरपीएफ ३७ बटालियनचे टी. गुनिया आणि पोलीस दलाचे गिरीधर तुलावी व विजयसिंग ठाकूर अशी जखमींची नावे आहेत. नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पथकावर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. तेव्हा पोलिसांनी देखील प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी आपल्याजवळील हत्यारे व साहित्य तेथेच टाकून जंगलाचा फायदा घेत पळून गेले. जखमी तिन्ही जवानांना छत्तीसगड राज्याच्या रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
24 एप्रिल रोजी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 25 जवान शहीद झाले तर सहा जवान जखमी झाले होते.