नवाब मलिक पुन्हा ठरले खोटे; वनविभागाच्या खुलाशाने खोटेपणा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 00:49 IST2016-01-24T00:49:24+5:302016-01-24T00:49:24+5:30
रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाला औषधी वनस्पतींसाठी वनजमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नवाब मलिक पुन्हा ठरले खोटे; वनविभागाच्या खुलाशाने खोटेपणा उघड
मुंबई : रामदेवबाबा यांच्या पतंजली समूहाला औषधी वनस्पतींसाठी वनजमीन देण्याचा प्रयत्न होत असल्याचे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या आधीही विविध खात्यांवर केलेले आरोप मलिक सिद्ध करू शकले नव्हते.
केवळ सनसनाटी निर्माण करून प्रसिद्धी लाटण्याचा त्यांचा स्वभाव बनल्याचा आरोप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. राज्यामध्ये वनक्षेत्राच्या जवळपास १५,५०० गावे असून, त्यात आदिवासींची संख्या अधिक आहे. लोकसहभागातून वन व वन्यजीव यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत. या समित्यांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या कलाकुसर असलेल्या वस्तू, औषधी वनस्पती आणि गौण वनउत्पादनांना बाजारपेठ नसल्याने, त्यांना योग्य भाव मिळत नाही. आदिवासींचे जीवनमान उंचावणे आणि त्यांची सामाजिक, तसेच आर्थिक उन्नती साधने हा शासनाचा हेतू होता. अशा वनव्यवस्थापन समित्यांनी आपली उत्पादने कोणाला द्यायची, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. त्यांना प्रशिक्षण व अन्य बाबींसंदर्भात सहाय्यभूत भूमिका बजाविण्याचे वनविभागाने ठरविले. त्यातून रामदेवबाबांची भेट घेतली गेली, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून रामदेव यांची भेट होती. मात्र, पतंजली समूहाबरोबर वनौषधी व इतर वनउत्पादनांची विक्री करण्याबाबत कोणताही करार झालेला नाही. रामदेव यांच्या कंपनीला औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी जमीन देण्याची बातमीही पूर्णत: निराधार आहे. वनजमीन कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तींना देण्यासंदर्भात केंद्रीय वनसंवर्धन कायदा अत्यंत कडक आहे. गरीब, कष्टकरी आदिवासींना उपजीविकेचे साधन निर्माण करून देण्याचा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न हे सरकार असे प्रयत्न करत असताना, मलिक यांनी आरोप करून गोरगरिबांच्या हक्कांच्या आड येऊ नये, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला आहे.