बुडणाऱ्या जहाजावरील २० जणांची सुखरूप सुटका नौदलाची कामगिरी
By Admin | Updated: June 23, 2015 03:07 IST2015-06-23T03:07:15+5:302015-06-23T03:07:15+5:30
खराब हवामानामुळे वसईजवळ समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजावरील २० खलाशांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. रविवारी मध्यरात्री जिंदाल कामाक्षी हे जहाज एका बाजूला

बुडणाऱ्या जहाजावरील २० जणांची सुखरूप सुटका नौदलाची कामगिरी
मुंबई : खराब हवामानामुळे वसईजवळ समुद्रात बुडणाऱ्या व्यापारी जहाजावरील २० खलाशांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. रविवारी मध्यरात्री जिंदाल कामाक्षी हे जहाज एका बाजूला कलल्याची माहिती नौदलाला मिळाल्यानंतर जवानांनी धडाकेबाज बचाव मोहीम हाती घेत जहाजावरील सर्व खलाशांची सुटका केली.
मुंबईपासून ४० आणि वसईपासून २५ नॉटीकल मैलांवर या जहाजात पाणी शिरल्याने २० जणांचा जीव धोक्यात आला. त्यामुळे नौसेनेकडे मदत मागण्यात आली. नौदलाने तातडीने बचावकार्य हाती घेत मदतीसाठी ‘सी-किंग हेलिकॉप्टर रवाना केले. तसेच आयएनएस मुंबई हे लढाऊ जहाजही तैनात करण्यात आले.
बुडत असलेले जहाज संतुलित करण्यासाठी एका बाजूने वजन वाढवण्यात आले. त्यानंतर खराब हवामानातही नौदलाच्या सी-किंग हेलिकॉप्टरने रात्रीच १९ खलाशांना सुखरूपपणे बुडत्या जहाजावरून बाहेर काढत आयएनएस शिक्रा जहाजावर आणून सोडले. तर, अन्य एका चॉपरने सकाळी जहाजावरील कप्तानास सुखरूपस्थळी आणले. कोचीनकडे निघालेल्या जा जहाजावर प्रत्येकी ३० टन वजनाचे तब्बल २४८ कंटेनर होते. खराब हवामान आणि वादळामुळे जहाज एका बाजूला झुकल्याचे जिंदाल कामाक्षीचे कप्तान महिंदर पाल प्रभाकर यांनी सांगितले.