देशी कट्टा जप्त

By Admin | Updated: June 29, 2014 00:42 IST2014-06-29T00:42:09+5:302014-06-29T00:42:09+5:30

अजनी पोलीस ठाण्यातील चार्लींनी आज दुपारी पुण्यातील एका गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याजवळून देशी कट्टा तसेच दोन जिवंत काडतूस जप्त केले. रोहित उत्तम शितवले (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे.

Native claw seized | देशी कट्टा जप्त

देशी कट्टा जप्त

पुण्यातील गुन्हेगार : जिवंत काडतूसही सापडले
नागपूर : अजनी पोलीस ठाण्यातील चार्लींनी आज दुपारी पुण्यातील एका गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याजवळून देशी कट्टा तसेच दोन जिवंत काडतूस जप्त केले. रोहित उत्तम शितवले (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. तो दौंड (पुणे) जवळच्या शितवलेवाडी येथील रहिवासी आहे.
अजनी ठाण्यातील चार्ली अभिषेक हरदास आणि पंकज सुरजुसे हे दोघे नरेंद्रनगर (बोरकुटे लेआऊट) भागात दुचाकीने गस्त करीत होते. दुपारी ४ च्या सुमारास त्यांना नरेंद्रनगर जवळच्या उड्डाण पुलाजवळून एक तरुण येताना दिसला. पोलीस दिसताच त्या तरुणाचे वर्तन बदलल्याने चार्ली अभिषेकला त्याचा संशय आला. त्यामुळे अभिषेकने त्याला दुरूनच आवाज दिला. पोलिसांसमोर जाण्याऐवजी तो तरुण पळून गेला. तो दिसेनासा झाल्यामुळे अभिषेकने याच भागातील चार्ली संजय गायकवाड तसेच अमर सूर्यवंशी या दोघांनाही बोलवून घेतले. चारही जणांनी परिसरात कसून तपासणी केली असता रेल्वेलाईनच्या बेशरमाच्या झुडूपात तो तरुण आढळला.
चार्लीने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ देशी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस सापडले. त्याला अजनी ठाण्यात नेल्यानंतर पीआय बी. पी. साळूंके, पीएसआय रवी राजूलवार, चार्ली अभिषेक, संजय, मनिषा साखरकर यांनी आरोपीची चौकशी केली तेव्हा त्याने आपले नाव,गाव आणि पत्ता सांगितला. (प्रतिनिधी)
उत्तर प्रदेशातून आणला कट्टा
आपण हा देशीकट्टा उत्तर प्रदेशातून आणल्याचे सांगितले. जवळ पैसे नसल्यामुळे विनातिकीट रेल्वेने नागपुरात आलो. अजनी स्थानकावर टीसीची नजर पडल्याने आपण पळत आलो आणि नरेंद्रनगरात शिरल्याचे त्याने सांगितले. त्याने हा कट्टा आणि काडतूस कुणाचा गेम करण्यासाठी आणला, त्याची चौकशी केली जात आहे. दरम्यान, चार्ली अभिषेक, संजय, पंकज आणि अमरने त्याला शिताफीने जेरबंद केल्याबद्दल या चौघांचेही कौतुक केले जात आहे.

Web Title: Native claw seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.