अतुल कुलकर्णी, मुंबईउसाला ५०० रुपये अनुदान द्या, अशी मागणी करीत विधानसभेत राष्ट्रवादीने आक्रमक खेळी केली खरी; मात्र नंतर त्यांनीच उपस्थित केलेला विषय पुढे त्यांच्या हातातून सुटला. काँग्रेसला एकटे पाडत राष्ट्रवादीने हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करताच काँग्रेसने आक्रमक होत सभागृहात भाजपाची साथ मिळवली आणि सगळ्या विषयाला वेगळेच वळण लागले. शेवटी हा प्रश्न प्रादेशिक अस्मितेपर्यंत जाऊन पोहोचला. विधानसभेत उसाला रास्त आधारभूत दर देण्यावरून झालेल्या चर्चेला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उत्तर देत होते, त्या वेळी सभागृहात काँग्रेसच्या बाकांवर विरोधी पक्षासह अनेक जण अनुपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादीला मैदान मोकळे मिळाले. जयंत पाटील यांनी सभागृह तहकूब करा़ अध्यक्षांच्या दालनात बैठक बोलवा़ निर्णय होईपर्यंत आम्ही अध्यक्षांच्या दालनातून उठणार नाही, अशी भूमिका घेतली. राष्ट्रवादीने असे काही दबावतंत्र निर्माण केले, की अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अध्यक्षांच्या दालनात गेले. तेथे बराच वेळ बैठक चालू होती. हे समजताच काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली. राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसनेही डाव टाकला. कापूस, सोयाबीन, धान उत्पादकांना काहीच नाही आणि उसासाठी मात्र तत्काळ घोषणा कशी काय, असा मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. कापूस विदर्भात जास्त असल्याने साहजिकच विदर्भातील भाजपा सदस्यही वडेट्टीवारांच्या सोबत आले. वडेट्टीवार असे काही आक्रमक झाले की त्यांना खाली बसवण्याचा प्रयत्न करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटीलही त्यांच्यापुढे हतबल झाले. काँग्रेससोबत भाजपाही आक्रमक झाली. शिवसेनाही वेलमध्ये उतरली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करता, तर मग कापसाला का नाही, असे म्हणत काँग्रेस, भाजपा, शिवसेनेचे सदस्य वेलमध्ये उतरले आणि सभागृहात राष्ट्रवादी एकटी पडली. राष्ट्रवादीला काहीही करून मुख्यमंत्र्यांचे उत्तर हवे होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘उसाच्या संबंधीचे निर्णय जाहीर करतो,’ असे सांगून एवढा मोठा पॉज घेतला, की तेवढ्या वेळात बाकीच्यांचा गदारोळ जोरात सुरू झाला.
राष्ट्रवादी जिंकली, राष्ट्रवादी हरली !
By admin | Updated: April 1, 2015 02:17 IST