सरकार स्थापनेत राष्ट्रवादी निर्णायक राहील
By Admin | Updated: October 10, 2014 05:18 IST2014-10-10T05:18:04+5:302014-10-10T05:18:04+5:30
हा सर्व खोटा प्रचार आहे. आमची भाजपाशी कोणतीही जवळीकता, छुपा समझोता वगैरे नाही.

सरकार स्थापनेत राष्ट्रवादी निर्णायक राहील
१५ वर्षांनंतर पहिल्यांदा काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे. काय असेल निवडणुकीनंतरचे चित्र?
पटेल - यंदा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळतील यात शंका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली याचा फटका काही प्रमाणात दोन्ही पक्षांना बसला असता, पण तिकडे शिवसेना-भाजपातही युती नाही. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. उलट काही प्रमाणात फायदाच होऊ शकतो. प्रत्येकासाठी आपली ताकद आजमावण्याची ही संधी आहे.
कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर पुन्हा आघाडी होईल?
पटेल - आम्ही स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करीत नाही. पण एवढे नक्की सांगतो की, सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक राहणार आहे. आता परिस्थिती पुढे काय वळण घेते हे सांगता येणार नाही. आज तरी त्याबद्दल जास्त बोलणे योग्य होणार नाही.
युती तुटताच आघाडी तुटल्याची घोषणा झाली, यात काही राजकीय समीकरण आहे?
पटेल - हा सर्व खोटा प्रचार आहे. आमची भाजपाशी कोणतीही जवळीकता, छुपा समझोता वगैरे नाही. भाजपा-सेनेची युती तुटताच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटण्याची घोषणा हा केवळ योगायोग आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामांकन भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक होते. त्यामुळे २५ सप्टेंबरच्या रात्री तो निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला. जागांच्या वाटाघाटीत काँग्रेसने ताणून ठेवल्यामुळे शेवटी आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदावर दावा राहणार, अशावेळी कोणाची साथ घेणार?
पटेल - ही वेळ प्रत्येकासाठी आपली ताकद आजमावण्याची आहे. यावर आताच काही बोलणे योग्य नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सध्या वातावरण आमच्यासाठी सकारात्मक आहे, एवढेच मी म्हणेल.
पुरोगामी महाराष्ट्रात अजूनपर्यंत महिला मुख्यमंत्री झाली नाही. संधी मिळाली तर राष्ट्रवादी हा बहुमान पटकावणार का?
पटेल - याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाच्या विधिमंडळ समितीचा आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनात आमचा पक्ष योग्य वाटचाल करीत आहे. सध्यातरी त्याबाबत काहीही निर्णय नाही आणि त्यामुळे भावी मुख्यमंत्री आम्ही म्हणून कोणालाही ‘प्रोजेक्ट’ पण करणार नाही.
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला राष्ट्रवादीने दूर सारलेले दिसते, याचा फटका बसणार नाही का?
पटेल - आम्ही हा मुद्दा दूर सारलेला नाही. जर सर्वसामान्य वैदर्र्भीय जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे असेल तर आमचा त्याला पाठींबाच राहील. त्यामुळे आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहोत, असे म्हणणे चुकीचे आहे. वास्तविक या मुद्द्यावर आता भाजपाचाच दुटप्पीपणा समोर येत आहेत.
तुम्ही १० वर्षे केंद्रात सत्तेत होते. आता सत्ताबदलानंतर मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळाकडे तुम्ही कसे पाहता?
पटेल - मोदी सरकारने सर्वांचा अपेक्षाभंग केला आहे. केवळ भाषण आणि घोषणाबाजीने काम होत नाही. लोकांचे मनोरंजन केल्याने काही होणार नाही. जे बोलतात ते करून दाखवावे लागते. परवा गोंदियात मोदींची सभा झाली. पण पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल, या भागात उद्योगधंद्याची उभारणी, रोजगार निर्मिती याबद्दल ते एक शब्दही बोलले नाही.