राष्ट्रवादीचे जेलभरो !
By Admin | Updated: September 15, 2015 01:51 IST2015-09-15T01:51:52+5:302015-09-15T01:51:52+5:30
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्तांना मदत करावी, चारा छावण्या सुरू व्हाव्यात आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी मराठवाड्यासह बुलडाणा

राष्ट्रवादीचे जेलभरो !
औरंगाबाद : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्तांना मदत करावी, चारा छावण्या सुरू व्हाव्यात आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी मराठवाड्यासह बुलडाणा जिल्ह्यात जेलभरो आंदोलन केले. तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये आंदोलक शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.
खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्यात वडीगोद्री येथे आंदोलन झाले. सुळे व आ. राजेश टोपे यांच्यासह पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडले. औरंगाबाद तालुक्यात करमाडमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व आ. सतीश चव्हाण यांनी नेतृत्व केले. तर औरंगाबादेत ऐनवेळी दोन ठिकाणी आंदोलन झाल्याने पक्षातील गटबाजीचे दर्शन घडले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्याचे विषप्राशन
गंगाखेडमध्ये रुमणा येथील शेतकरी गुणाजी श्यामराव सोळंके (४५) यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली. सोळंके यांनी विषप्राशन केल्याचे कोणाच्याही लक्षात आले नव्हते. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
खुनाचा गुन्हा नोंदवणार का ?
-विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. आता ते स्वत:वर खुनाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
-मुख्यमंत्र्यांनी तातडीने संपूर्ण कर्जमाफी करावी. दुधाला २५ रुपये प्रति लिटर भाव द्यावा, अन्यथा एकाही मंत्र्याला मराठवाड्यात फिरु देणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.
-राज्यात १०६ ठिकाणी शेतकरी बैलगाड्यांसह रस्त्यांवर उतरले होते. मी व अजित पवार यांनी पक्षाच्या मुख्यालयात बसून आंदोलन शांततेत पार पडावे, यासाठी समन्वय ठेवला, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
वेळ चुकली -खडसे
राष्ट्रवादीच्या आंदोलनाची वेळ चुकली, असा टोला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लगावला. राजकीय आंदोलन करुन तुरुंगात जाण्यापेक्षा सिंचन घोटाळ््याच्या आरोपांखाली तुरुंगात जाणे अजित पवार व सुनील तटकरे यांनी पसंत केले असेल व त्यामुळेच ते आंदोलनात सहभागी झाले नसल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली.