पक्षांतर प्रकरणाची राष्ट्रवादीकडून दखल
By Admin | Updated: September 18, 2016 00:30 IST2016-09-18T00:30:09+5:302016-09-18T00:30:09+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले नगरसेवकाचे पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच खटकले आहे

पक्षांतर प्रकरणाची राष्ट्रवादीकडून दखल
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले नगरसेवकाचे पक्षांतर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच खटकले आहे. ‘काही अडचणी असतील तर माझ्याशी बोला, ते होत नसेल तर खासदार सुप्रिया सुळे व तेही जमत नसेल तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही तुम्ही बोलू शकता,’ असे सांगून थेट नाव न घेता पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना चुचकारले.
निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी पवार यांच्या उपस्थितीत एका हॉटेलमध्ये नगरसेवक, विभागीय अध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, पक्षप्रवक्ते अंकुश काकडे आदी या वेळी उपस्थित होते. सर्वेक्षणात पक्षाचीच सत्ता येणार, असे निष्कर्ष निघाले आहेत; मात्र फाजील आत्मविश्वास पराभव करू शकतो. १०० जागा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवा. पिंपरी-चिंचवडप्रमाणे एकहाती सत्ता आली पाहिजे, असे पवार यांनी बजावले. मतभेद गाडून टाका; त्यामुळे फक्त पक्षाचे व वैयक्तिकही नुकसानच होते, असे ते म्हणाले.
पक्षाचा जाहीरनामा कसा असावा, यावरही बैठकीत चर्चा झाली. विविध नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त केली.
पक्षाची बैठक संपली, की लगेचच माध्यमांना त्याची माहिती जाते. असे कोण करते त्याची माहिती मला आहे. त्यामुळे हे करू नका. पक्षात दुफळी असल्याचे चित्र निर्माण झाले, तर त्याचा फायदा विरोधक घेतात. त्यामुळे आतल्या गोष्टी आतच ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.