कोल्हापुरात राष्ट्रवादी बेघर
By Admin | Updated: June 4, 2015 00:44 IST2015-06-04T00:33:39+5:302015-06-04T00:44:43+5:30
पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वत:च्या मालकीचे कोल्हापुरात कार्यालय नाही.

कोल्हापुरात राष्ट्रवादी बेघर
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्यालय असलेली शिवाजी स्टेडियममधील जागा खाली करण्यास सांगण्यात आल्यामुळे पक्षाला नवीन कार्यालयाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. शहर कार्यालयात झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी केलेल्या भाषणातून ही माहिती स्पष्ट झाली.
गेल्या पंधरा वर्षांपासून शहर राष्ट्रवादीचे कार्यालय शिवाजी स्टेडियममधील एका गाळ्यात असून हा गाळा बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांच्या मालकीचा आहे, तर जिल्हा कार्यालय ताराबाई पार्क येथील एका इमारतीच्या तळमजल्यावर असून ती जागा संगीता खाडे यांच्या मालकीची आहे. मुळात जिल्हा कार्यालयही पार्किंगच्या जागेतच वसलेले आहे. पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वत:च्या मालकीचे कोल्हापुरात कार्यालय नाही.
बुधवारी शहर कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभात किसन कल्याणकर यांनी कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित केला. पक्षाने स्वत:च्या जागेत कार्यालय सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली. त्याचा संदर्भ देत आर. के. पोवार यांनी शहर आणि जिल्हा कार्यालय एकत्र सुरू करण्यासाठी रेल्वे फाटक क्रमांक २ (टेंबलाई फाटक)जवळ जागा पाहिली आहे. बांधकाम खर्च पक्षाने करावा, अशी आमची भूमिका आहे परंतु त्यातून अद्याप मार्ग निघालेला नाही. शहर कार्यालयाची जागा सोडण्याबाबत मालकांनी विनंती केली असल्याने पक्षाला स्वत:चे कार्यालय उभारावे लागणार असल्याचे पोवार यांनी सांगितले.
शहर कार्यालयाचे चाळीस हजार रुपये वीजबिल थकले होते, मूळ मालकांनी हात वर केले. मी तुम्हाला गाळा दिलाय आता वीज आणि फाळा तुम्ही भरा, असे सांगून त्यांनी आपली बाजू काढून घेतली. त्यामुळे थकलेल्या वीज बिलासाठीही पक्षाला दुसऱ्याकडे हात पसरावे लागले होते. (प्रतिनिधी)
शिवाजी स्टेडियमधील शहर कार्यालयाची जागा खाली करण्याची सूचना
जिल्हा कार्यालयही ताराबाई पार्कात पार्किंगच्या जागेत
गेल्या पंधरा वर्षांपासून मालकीचे कार्यालय नाही
शहर व जिल्हा कार्यालयासाठी रेल्वेच्या टेंबलाई फाटकाजवळ जागेची पाहणी