राज्यात राबविणार राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान
By Admin | Updated: July 3, 2014 23:00 IST2014-07-03T20:44:55+5:302014-07-03T23:00:45+5:30
विविध केंद्रीय योजनांचे एकत्रिकरण

राज्यात राबविणार राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान
वाशिम : २0१४-१५ पासून नव्याने राबविण्यात येणार्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राज्यात ४८ कोटी १९ लाख ५५ हजार रुपयांच्या निधीतून कोरडवाहू क्षेत्रविकासाचे कार्यक्रम राबविण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात कोरडवाहू शाश्वत शेती विकास कार्यक्रम राबविण्यात येत होता. सन २0१४-१५ पासून केंद्र शासनाने केंद्रपुरस्कृत योजनांची पुनर्रचना केली असून, काही योजना एकत्रित करुन राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी सुक्ष्म सिंचन अभियान, राष्ट्रीय सेंद्रीय शेती प्रकल्प, राष्ट्रीय मृदा आरोग्य व सुपीकता व्यवस्थापन प्रकल्प, कोरडवाहू शाश्वत शेती विकास कार्यक्रम आदी योजनांचे एकत्रिकरण करण्यात आले असून, अभियानाच्या खर्चाला १ जुलै रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या अभियानात कोरडवाहू क्षेत्रविकास, शेती जलव्यवस्थापन, मृदा आरोग्य व्यवस्थापन, वातावरण बदल व आणि शाश्वत शेती सनियंत्रण, रचना व संचालन या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत विकास कामे राबविण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करताना अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी व मागासवर्गीय शेतकर्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांची यादी कृषी विभागाची तालुका कार्यालये, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांमध्ये लावण्याचे व कृषी विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्याचे निर्देश कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत.