टपाल तिकिटे संग्रहाचा केला राष्ट्रीय विक्रम
By Admin | Updated: May 22, 2016 00:34 IST2016-05-22T00:34:15+5:302016-05-22T00:34:15+5:30
चित्रपटसृष्टीवरील टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद देहूरोड येथील ३२वर्षीय तरुण संदीप बोयत याला आहे. चित्रपटाच्या प्रेमातून हिंदी, मराठी, दाक्षिणात्य कलाकारांची टपाल तिकिटे जमवली आहेत

टपाल तिकिटे संग्रहाचा केला राष्ट्रीय विक्रम
देहूरोड : चित्रपटसृष्टीवरील टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद देहूरोड येथील ३२वर्षीय तरुण संदीप बोयत याला आहे. चित्रपटाच्या प्रेमातून हिंदी, मराठी, दाक्षिणात्य कलाकारांची टपाल तिकिटे जमवली आहेत. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या छंदाची इंडिया बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली असून, त्याला विक्रमाचे राष्ट्रीय प्रमाणपत्र नुकतेच प्रदान केले आहे.
बोयत यांच्या या तिकीट छंदाबाबत ‘लोकमत’ने ९ मार्च २०१६ ला छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. बोयत याने कलाकारांसह गायक, दिग्दर्शक, निर्माते यांच्या तिकिटांचादेखील संग्रह केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत त्याने विविध प्रदर्शनांतून हा संग्रह जोपासला आहे.
त्यांच्या संग्रहात बलराज साहनी, चेतन आनंद, कमाल अमरोही, पृथ्वीराज चौहान, राजेश खन्ना, संजीव कुमार, देव आनंद, अशोक कुमार, शम्मी कुमार, बी. आर. चोपडा, राजेंद्र कुमार, मेहमूद, आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, नौशाद, लता मंगेशकर, शंकर जयकिशन, गीता दत्त, सुरैया, उत्पल दत्त, यश चोप्रा, दुर्गा खोटे, भालती पेंढारकर, स्मिता पाटील, राज कपूर, किशोर कुमार अशा नामवंत कलाकारांची तिकिटे आहेत. संग्रहात नव्वदच्या दशकापासून २०१५पर्यंतच्या टपाल तिकिटांचा समावेश आहे.
संदीपचे वडील चित्रपटात सहाय्यक कॅमेरामन होते. त्यामुळे त्यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध आला. प्रसिद्ध तारका सहसा कोणाला भेटत नाहीत. टपाल तिकिटाच्या माध्यमाने त्या आपल्या सोबत असल्याचा आनंद ते घेत आहेत. (वार्ताहर)