रेल्वेतून राष्ट्रीय एकात्मता
By Admin | Updated: June 2, 2014 05:53 IST2014-06-02T05:53:30+5:302014-06-02T05:53:30+5:30
आपण रेल्वेमधून सर्वाधिक प्रवास केला असून येथे कोणतीही जातपात नाही़ रेल्वे सर्वांना जोडते़ विविधतेने नटलेल्या या देशात रेल्वेने राष्ट्रीय एकात्मता साधली

रेल्वेतून राष्ट्रीय एकात्मता
पुणे : आपण रेल्वेमधून सर्वाधिक प्रवास केला असून येथे कोणतीही जातपात नाही़ रेल्वे सर्वांना जोडते़ विविधतेने नटलेल्या या देशात रेल्वेने राष्ट्रीय एकात्मता साधली आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले़ वाढदिवसानिमित्त आज डेक्कन क्वीनला फुलांच्या माळांनी सजविण्यात आले होते़ डेक्कन क्वीनचा ८५ वा वाढदिवस प्रतिभाताई पाटील, देवीसिंह शेखावत, रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला़ यासाठी डेक्कन क्वीन तसेच पंजाब मेल यांच्या प्रतिकृतीचे आकर्षक केक तयार करण्यात आले होते़ या वेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे अप्पर महाव्यवस्थापक ए़ बी़ मेढेकर, स्टेशनमास्तर सुनील कमठाण, बी़ व्ही़ पाटील, जनसंपर्क अधिकारी वाय़ के. सिंह आदी उपस्थित होते़ रविवारची सुट्टी असली तरी दररोज डेक्कन क्वीनने प्रवास करणारे शेकडो प्रवासी यावेळी आवर्जून उपस्थित होते़ या प्रवाशांनी रक्तदान कार्यक्रमाचेही आयोजन केले होते़ प्रतिभाताई पाटील यांनी डेक्कन क्वीनच्या कर्मचार्यांशी संवाद साधला़ या वेळी पाटील यांनी आपल्यालाही डेक्कन क्वीनने प्रवास करायला आणि या ठिकाणी बसून नाश्ता करायला आवडेल, असे सांगितले़ त्यानंतर पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविल्यावर डेक्कन क्वीन मुंबईकडे रवाना झाली़ (प्रतिनिधी)