राष्ट्रीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षावर गुन्हा
By Admin | Updated: April 8, 2017 05:21 IST2017-04-08T05:21:36+5:302017-04-08T05:21:36+5:30
राष्ट्रीय छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे याच्याविरुद्ध बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

राष्ट्रीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षावर गुन्हा
बदलापूर (ठाणे) : एअरहोस्टेस असलेल्या येथील एका विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रीय छावा संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे याच्याविरुद्ध बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा काही तरुणांसोबत वाद झाला होता. या वादातून त्याला मारहाणही झाली होती. त्या व्यक्तीला पोलिसांकडून मदत मिळवून देतो, असे सांगत गोळे याची त्या व्यक्तीसोबत ओळख झाली. उल्हासनगरात वास्तव्याला असलेल्या गोळे याची त्या व्यक्तीच्या पत्नीशी ओळख झाली. तिला लग्नाचे आमिष दाखवून गोळे याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.
आपल्या पत्नीचे गोळे याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे कळल्यावर त्या महिलेच्या नवऱ्याने त्यास विरोध केला. मात्र, गोळे याने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ही महिला पतीला दुरावली. त्यानंतर, गोळे याने पीडित महिला व तिच्या चार वर्षांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे.