नाथाभाऊ ‘आरे’च्चा!

By Admin | Updated: June 11, 2015 03:07 IST2015-06-11T03:07:07+5:302015-06-11T03:07:07+5:30

आरे कॉलनीत मेट्रो रेल्वे कारशेडकरिता जागा देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील विसंवाद काल महाराष्ट्राने अनुभवला.

Nathabhau 'Aareycha'! | नाथाभाऊ ‘आरे’च्चा!

नाथाभाऊ ‘आरे’च्चा!

मुंबई : आरे कॉलनीत मेट्रो रेल्वे कारशेडकरिता जागा देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील विसंवाद काल महाराष्ट्राने अनुभवला. कारशेडसाठी अन्य पर्याय नसल्याने आरेतील जागा द्यावी लागेल, असे वक्तव्य खडसे यांनी वृत्तवाहिनीवर करताच फडणवीस यांनी टिष्ट्वट करून असा कुठलाही निर्णय झालेला नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विदेश दौऱ्यानंतर मायदेशी परतले असताना खडसे यांनी कारशेडचा विषय छेडून मुख्यमंत्री फडणवीस यांची कोंडी करण्याची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
मेट्रो कारशेडकरिता आरे कॉलनीमधील ३० हेक्टर जमीन देण्याच्या प्रस्तावाला शिवसेना व मनसेचा कडाडून विरोध आहे. पर्यावरणवादी संघटनांनीही विरोधाचे निशाण फडकवले आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी बुधवारी आरे कॉलनीला भेट देऊन पाहणी केली. या वेळी मेट्रोच्या कारशेडबाबत आरे व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर खडसे म्हणाले, की याबाबत सरकारने तज्ज्ञांची समिती नेमली आहे. मेट्रो कारशेडकरिता आरेची जागा दिली नाही तर मेट्रो प्रकल्प रद्द करावा लागेल. आता मेट्रो प्रकल्प रद्द करून लोकांची गैरसोय करायची की अन्य जागेचा पर्याय नसल्यास हीच जागा द्यायची, याचा निर्णय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर करावा लागेल.

Web Title: Nathabhau 'Aareycha'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.