नाशिकच्या ‘कलाग्राम’ला अंतिम टप्प्यात ‘ग्रहण’
By Admin | Updated: October 22, 2016 23:53 IST2016-10-22T23:53:36+5:302016-10-22T23:53:36+5:30
नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटनाचा विकास व्हावा व पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालवता यावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी

नाशिकच्या ‘कलाग्राम’ला अंतिम टप्प्यात ‘ग्रहण’
>- अझहर शेख/ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि.22 - नाशिकच्या पर्यटनाला चालना मिळावी, पर्यटनाचा विकास व्हावा व पर्यटकांना शहरात अधिकाधिक वेळ घालवता यावा, यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर ‘कलाग्राम’ उभारणीचे काम हाती घेतले; बांधकाम अंतिम टप्प्यात येऊन बंद पडले आहे. तीन ते चार महिन्यांपासून निधीअभावी काम ठप्प झाल्याने कुंभमेळ्यामध्ये पर्यटकांच्या सेवेत येणाºया ‘कलाग्राम’ला पुन्हा ग्रहण लागले आहे. कुंभमेळा उलटून वर्षभराचा कालावधी उलटूनही अद्याप कलाग्रामचा शुभारंभ होऊ शकला नाही.
दोन वर्षांपूर्वी ‘कलाग्राम’ उभारणीसाठी महामंडळाकडून भूसंपादन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविल्याने कलाग्रामचे भूमिपूजन वादग्रस्त ठरले होते; मात्र यावर तत्कालीन जिल्हाधिकारी, महामंडळाचे अधिकारी व पोलीस प्रशासनाने तोडगा काढला आणि कलाग्राम आकाराला येण्यास सुरुवात झाली. २०१४ साली कलाग्रामच्या बांधकामाला प्रारंभ झाला. दिल्लीच्या हाट बाजाराच्या धर्तीवर सुमारे पाच एकर जागेत कलाग्रामची उभारणी सुरू आहे. जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक कायमची बाजारपेठ या माध्यमातून साकारण्याचा उद्देश आहे. या बाजारपेठेत आदिवासी बांधवांनाही त्यांच्या हस्तकलेतून विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील दुर्गम भागातील कला विकसित होण्यास मदत होईल. याबरोबरच नाशिकच्या पर्यटनालाही वाव मिळेल असा विश्वास पर्यटन महामंडळाला आहे.