नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नान !
By Admin | Updated: June 4, 2015 04:09 IST2015-06-04T04:09:46+5:302015-06-04T04:09:46+5:30
शैव आणि वैष्णव आखाड्यातील वाद मिटून समन्वय व्हावा, यासाठी पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन्ही पंथीयांना स्नानाचे ठिकाण

नाशिकच्या आखाड्यांचे यंदा त्र्यंबकलाही स्नान !
नाशिक : शैव आणि वैष्णव आखाड्यातील वाद मिटून समन्वय व्हावा, यासाठी पेशव्यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे दोन्ही पंथीयांना स्नानाचे ठिकाण निश्चित केले असले, तरी त्र्यंबकेश्वर येथे वैष्णव पंथीयांना स्नानासाठी वेळ राखीव ठेवला जातो. आजवर वैष्णव पंथीयांनी त्र्यंबकेश्वरी स्नान केले नसले तरी यंदा मात्र नाशिकमधील वैष्णव आखाडे २५ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वर येथे शाही स्नान करणार आहेत.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी बुुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. नाशिकमध्ये वैष्णवांचे तीन, तर त्र्यंबकेश्वरी शैव पंथीयांचे दहा आखाड्यांचे साधू- महंत स्नान करतात. पूर्वी शैव आणि वैष्णव हे नाशिक शहराजवळ गंगापूर धरणाच्या पाणवठ्यावर स्नान करीत. परंतु शेकडो वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यांच्यात स्नानावरून वाद झाले आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने शेकडो साधूंना प्राण गमवावे लागले. त्यावेळी पेशव्यांनी शैव पंथीय साधू त्र्यंबकेश्वर आणि वैष्णव पंथीय साधू नाशिकच्या रामकुंडात स्नान करतील, असा निवाडा दिला होता. संबंधित परंपरा आजपर्यंत सुरू असली तरी, त्र्यंबकेश्वरी वैष्णव पंथीयांना पर्वणीच्या दिवशी दोन तास स्नानासाठी राखीव असतात. पेशव्यांनी तशी व्यवस्था करून दिली होती; परंतु नाशिकचे आखाडे तेथे जात नाहीत. यंदा मात्र नाशिकचे वैष्णव पंथीय त्र्यंबकेश्वरलाही स्नान करतील, अशी माहिती महंत ग्यानदास यांनी दिली. कुंभमेळ्यात यंदा २९ आॅगस्ट आणि १३ सप्टेंबरला एकाच दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पर्वणी कालावधीत स्नान होणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये १८ सप्टेंबरला तिसरे आणि अखेरचे शाहीस्नान होणार आहे.