आरटीओ कर्मचारीच निघाला वेबसाईट हॅकिंगचा सूत्रधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:24 IST2017-09-11T23:18:52+5:302017-09-11T23:24:01+5:30

आरटीओ कर्मचारीच निघाला वेबसाईट हॅकिंगचा सूत्रधार
नाशिक : आरटीओ अधिकाºयाचा लॉगइन आयडी व पासवर्ड हॅक करून व्यावसायिक वाहनांचे बनावट योग्यता प्रमाणपत्र देणारा आरटीओ कर्मचारीच असल्याचे तपासात उघड झाले आहे़ कनिष्ठ लिपिक परितोष रणभोर असे या संशयित कर्मचाºयाचे नाव असून, तो फरार आहे. त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांनी दिली़
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील व्यावसायिक वाहने तपासणी निरीक्षक हेमंत गोविंद हेमाडे यांचा लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून तपासणीसाठी न आणताच वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले होते़ याप्रकरणी १९ आॅगस्ट रोजी हेमाडे यांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता़ पोलीस निरीक्षक पवार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आयपी अॅड्रेस व कॉल डिटेल्सवरून आरटीओ कार्यालयातील कर्मचारी परितोष रणभोर याने हा प्रकार केल्याचे समोर आले़ त्याने आतापर्यंत १३ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचेही तपासात समोर आले आहे़
दरम्यान, संशयित रणभोर याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सोमवारी (दि़११) फेटाळला असून, अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. रणभोर याच्या शोधासाठी पोलीस पथकेही रवाना करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले आहे़