महाराष्ट्राची नाचक्की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक
By Admin | Updated: January 26, 2015 13:31 IST2015-01-26T13:30:45+5:302015-01-26T13:31:05+5:30
मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा फलक लावल्याने राज्याची नाचक्की झाली आहे.

महाराष्ट्राची नाचक्की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात घोडचूक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - राजपथावर चित्ररथातून महाराष्ट्राची शान दाखवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच मुंबईत महाराष्ट्र सरकारच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ६६ ऐवजी '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा फलक लावल्याने वाद निर्माण झाला आहे. देशाचा हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे याची सरकारला माहिती नसणे ही दुर्दैवी बाब असून सरकारने संबंधीत अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
देशभरात आज ६६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र सरकारला मात्र नेमका याचाच विसर पडल्याचे दिसते. शिवाजी पार्कवर सरकारच्या वतीने ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात '६५ वा प्रजासत्ताक दिन' असा मोठा फलक लावण्यात आला होता. विशेष म्हणजे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या भाषणातही ६५ वा प्रजासत्ताक दिन असाच उल्लेख केला गेला अशी माहिती समोर येत आहे. देशाचा कितवा प्रजासत्ताक दिन आहे हे सरकारला माहित नसणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीदेखील याविषयी नाराजी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिन कितवा आहे यावरुन गोंधळ निर्माण होणे यातून सरकारची उदासीनता दिसून येते, सरकारने याप्रकरणात जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.