नाशिक जिल्ह्यात संततधार, ४० टॅँकर घटले!
By Admin | Updated: July 4, 2016 19:52 IST2016-07-04T19:52:58+5:302016-07-04T19:52:58+5:30
जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी, नाले खळाळून वाहू लागले असून, काही प्रमाणात विहिरींना पाणी लागल्याने त्याचा परिणाम टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर झाला

नाशिक जिल्ह्यात संततधार, ४० टॅँकर घटले!
ऑनलाइन लोकमत
नाशिक : जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी, नाले खळाळून वाहू लागले असून, काही प्रमाणात विहिरींना पाणी लागल्याने त्याचा परिणाम टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर झाला असून, पाच तालुक्यांनी टॅँकर पूर्णपणे बंद केल्यामुळे अडीचशेवर असलेली टॅँकरची संख्या थेट दोनशेवर येऊन पोहोचली आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवार व रविवार तसेच सोमवारीही दिवसभर पावसाने हजेरी कायम ठेवल्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ तर झालीच, परंतु कोरड्याठाक पडलेल्या नदी, नाले वाहू लागले आहेत. शेतकऱ्यांनीही शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. विशेष करून ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटण्यास हा पाऊस कारणीभूत ठरला असून, जूनच्या अखेरच्या आठवड्यात अडीचशेपर्यंत पोहोचलेली टॅँकरची संख्या दिवसागणिक घटण्यास सुरुवात झाली आहे.
गेल्या आठवड्यात बारा टॅँकर घटले होते, आता तीच संख्या पन्नासवर पोहोचली आहे. नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, कळवण व पेठ या पाच तालुक्यांतील टॅँकर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय तहसीलदारांनी घेतला आहे. तरीदेखील निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव, बागलाण, नांदगाव, चांदवड, देवळा या तालुक्यांतील २०४ गावे व ५२४ वाड्यांना दोनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.