नरेंद्र मोदींची हिटलरशाही - शिवसेनेच्या महापौर स्नेहल आंबेकर
By Admin | Updated: July 20, 2015 19:03 IST2015-07-20T14:11:07+5:302015-07-20T19:03:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींची शासनपद्धती मला हिटलरशाहीसारखं वाटते, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर व शिवसेना नेत्या स्नेहल आंबेकर यांनी केले आहे.

नरेंद्र मोदींची हिटलरशाही - शिवसेनेच्या महापौर स्नेहल आंबेकर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पंतप्रधान नरेंद्र मोदींची शासनपद्धती मला हिटलरशाही असल्यासारखं वाटते, असे वक्तव्य मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या स्नेहल आंबेकर यांनी केले आहे.
'दि आफ्टरनून' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपा व मित्रपक्ष शिवसेना यांच्यात अनेक दिवसांपासून खटके उडत असतानाच शिवसेनेच्या नेत्या असलेल्या स्नेहल आंबेकर यांनी पंतप्रधान मोदींची तुलना थेट जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरशी केल्याने आता नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.
'नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करतात त्याचा मी एक व्यक्ती म्हणून आदर करते, स्वत:च्या क्षमतेवर त्यांना प्रचंड विश्वास आहे. मात्र कधीकधी त्यांचे शासन मला हिटलरशाहीसारखं वाटतं. जेव्हा एकाच व्यक्तीच्या हातात सर्व सत्ता एकवटली जाते तेव्हा असं होणं स्वाभाविकच आहे' असेही आंबेकर यांनी म्हटले आहे.
राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा- शिवसेनामध्ये सतत काही ना काही कुरबूरी सुरूच आहेत. मग तो नाईट लाईफचा वाद असे किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेली टीका असो, भाजपा व शिवसेनेतील वाद थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. सर्वात कमी वयाच्या पहिल्या महापौर असलेल्या आंबकेर या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यातच त्यांच्या या वादग्रस्त विधानाने दोन्ही पक्षातील वाद आणखी उफाळण्याची शक्यता आहे.