नरेंद्र मोदीच जबाबदार!
By Admin | Updated: February 11, 2015 08:36 IST2015-02-11T02:05:46+5:302015-02-11T08:36:16+5:30
जनतेला कोणीही गृहीत धरू नये. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे दिल्लीतील निकालातून दिसून आले. दिल्लीकरांनी आमिषांना बळी न पडता मतदान केले, अशा डागण्या देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पराभवास पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदीच जबाबदार!
मुंबई : जनतेला कोणीही गृहीत धरू नये. लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते हे दिल्लीतील निकालातून दिसून आले. दिल्लीकरांनी आमिषांना बळी न पडता मतदान केले, अशा डागण्या देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पराभवास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडगोळीला जबाबदार धरले.
दिल्लीतील निकालाचा कौल लक्षात येताच अत्यंत चपळाईने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले. दिल्लीत झालेल्या भाजपाच्या दारुण पराभवाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. ते म्हणाले, दिल्लीतील जनतेने नवख्या आम आदमी पक्षाला ‘झाडून’ मतदान केले. या यशाबद्दल मी केजरीवाल यांचे फोन करून अभिनंदन केले. आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत.
दिल्लीतील पराभवास किरण बेदी नव्हे, तर मोदीच जबाबदार आहेत, या अण्णा हजारेंच्या मताशी आपण सहमत असल्याचेही उद्धव यांनी सांगून टाकले! दिल्लीकर जनतेने ‘आमिषा’ला (अमित शहा यांचा पुसटसा उल्लेख करीत) बळी न पडता मतदान केले, असा मार्मिक टोला लगावत दिल्लीकर जनतेने दिल्लीश्वरांना दिलेला हा इशारा आहे, असे सांगून उद्धव यांनी मोदींकडे बोट दाखवले.
भगवे झेंडे फडकले!
उद्धव यांची पत्रपरिषद चालू असतानाच शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन शिवालयावर दाखल झाले. त्यांनी आपले निशाण फडकावून भाजपाला एक प्रकरे डिवचण्याचेच काम केले.