‘नार्को’स न्यायालयाचा नकार
By Admin | Updated: November 28, 2014 02:23 IST2014-11-28T02:23:12+5:302014-11-28T02:23:12+5:30
व्यक्तिस्वातंत्र्याचा दाखला देत साक्षीदारांच्या इच्छेविरुद्ध नार्को करता येणार नाही, असा निकाल देत पाथर्डी न्यायालयाने पोलिसांचा अर्ज रद्द ठरविला़

‘नार्को’स न्यायालयाचा नकार
पाथर्डी (अहमदनगर) : जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिघांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार साक्षीदारांची नार्कोसह इतर चाचण्या करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती़ व्यक्तिस्वातंत्र्याचा दाखला देत साक्षीदारांच्या इच्छेविरुद्ध नार्को करता येणार नाही, असा निकाल देत पाथर्डी न्यायालयाने पोलिसांचा अर्ज रद्द ठरविला़
21 ऑक्टोबरला जाधव कुटुंबातील तिघांची क्रूरपणो हत्या झाली. घटनेला एक महिना उलटून गेला तरी तपासात प्रगती नाही़ या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी सहा साक्षीदारांची नार्को तसेच अन्य चाचण्या करण्यास न्यायालयाकडे परवानगी मागितली होती़ त्यातील सहाही साक्षीदारांनी नार्कोसह अन्य चाचण्या करण्यास हरकत नसल्याचे सांगितल्यामुळे न्यायालयाने त्यास परवानगी दिली होती़ त्यानुसार त्यांची चाचणी झाली़ त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही़ त्यानंतर पोलिसांनी न्यायालयाकडे आणखी चार जणांची नार्को तसेच इतर चाचणी करण्यास परवानगी मिळावी, यासाठी अर्ज सादर केला़ विशेष म्हणजे चार जणांपैकी तिघे जण जाधव कुटुंबातील असून, एक जण निकटवर्तीय आहे. गुरुवारी दुपारी पाथर्डी येथील न्यायालयात याबाबत सुनावणी झाली़
पोलिसांनी यापूर्वी अनेक वेळा साक्षीदारांची चौकशी केली आह़े त्यांना सहकार्य केलेले आह़े परंतु तपास लागत नाही़ म्हणून त्रस देण्याच्या हेतूने त्यांनी नार्को तसेच इतर चाचण्या करण्याचा अर्ज केला आह़े पोलिसांनी कुटुंबालाच लक्ष्य केले आह़े, असे सांगत नार्को तसेच इतर चाचण्या घेण्यास वकिलांमार्फत साक्षीदारांनी हरकत नोंदविली़
हत्यांकाडाचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आह़े तपासाच्या दृष्टीने तसेच माहिती मिळविण्यासाठी नार्को तसेच अन्य चाचण्या करण्यास परवानगी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायाधीश व्ही.एस. चौगुले यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा दाखला देत इच्छेविरुद्ध नार्को तसेच इतर चाचण्या करता येत नाहीत, असे साक्षीदारांचे म्हणणो ग्राह्य धरत पोलिसांचा अर्ज बाद ठरविला. (प्रतिनिधी)