नारायण राणे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात ?
By Admin | Updated: March 11, 2015 21:16 IST2015-03-11T19:11:39+5:302015-03-11T21:16:49+5:30
गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या नारायण राणेंना काँग्रेसने पुन्हा विधानसभेत पाठवण्याची रणनिती आखली आहे.

नारायण राणे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात ?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या नारायण राणेंना काँग्रेसने पुन्हा विधानसभेत पाठवण्याची रणनिती आखली आहे. शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात काँग्रेसकडून नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाईल असे समजते.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव झाला होता. यानंतर प्रदेशाध्यक्ष व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड करताना पक्षनेतृत्वाने डावलल्याने नारायण राणे नाराज झाल्याची चर्चा आहे. मात्र राणे यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने नवी खेळी खेळली आहे. बाळा सावंत यांच्या निधनाने वांदे पूर्व मतदारसंघाची जागा रिक्त आहे. या मतदारसंघात येत्या काही दिवसांमध्ये पोटनिवडणूक होणार असून या निवडणुकीत राणेंना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने मांडला आहे. या मतदार संघात मुस्लीम मतदारांचे वर्चस्व असून त्यांनी काँग्रेसला साथ दिल्यास राणे पुन्हा विधानसभेत दाखल होऊ शकतात.
वांद्रे पूर्व मतदारसंघात भाजपानेही उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बाळा सावंत विजयी झाले असली तरी भाजपा दुस-या व एमआयएम तिस-या स्थानावर होती. त्यामुळे ही निवडणूक राणेंसाठी आव्हानात्मक ठरु शकते. २२ - २३ मार्चपर्यंत निवडणूक लढवायची की नाही यावर अंतिम निर्णय घेऊ असे नारायण राणे यांनी सांगितले.