नारळीकरांना साहित्य अकादमी पुरस्कार

By Admin | Updated: December 20, 2014 03:02 IST2014-12-20T03:02:41+5:302014-12-20T03:02:41+5:30

साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली

Naralikar Saha Sahitya Akademi Award | नारळीकरांना साहित्य अकादमी पुरस्कार

नारळीकरांना साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई : साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक व शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिका माधवी सरदेसाई यांना साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. जयंत नारळीकर यांना ‘चार नगरातले माझे विश्व’ या आत्मकथनात्मक पुस्तकासाठी तर माधवी सरदेसाई यांना कोकणी भाषेतील ‘मंथन’ या लेखसंग्रहासाठी गौरवण्यात येणार आहे.
गोवा विद्यापीठातील कोकणी विभागात ज्येष्ठ व्याख्यात्या असलेल्या माधवी सरदेसाई ‘जाग’ या कोकणी नियतकालिकाच्या संपादक आहेत. कोकणी साहित्यातील संशोधनात्मक लेखनात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
साहित्य अकादमी पुरस्काराच्या इतर मानकऱ्यांमध्ये आसामी-अरूपा पतंगिया कलिटा (मरियम अस्टिन अथाबा हिरा बारुआ), बंगाली- उत्पलकुमार बासू (पिया माना भाबे), बोडो-उरखाओ ग्वरा ब्रह्मा (उदग्नीफ्राय गिदिंगफिनाय), डोगरी- शैलेंद्र सिंग (हाशिये पार), गुजराती- कै. अश्विन मेहता (छबी भितरनी), इंग्रजी- अदिल जुस्सावाला (ट्रायिंग टू से गुडबाय), हिंदी- रमेशचंद्र शहा (विनायक), कन्नड- जी. एच. नायक (उत्तरार्ध), काश्मिरी- शद रमझान (कोरे ककुड पुशरिथ गोमे), मैथिली- आशा मिश्रा (उचट), मल्याळाम- शुभाष चंद्रन (मनुष्यानू ओरू आमुखम), नेपाळी - नंद हंखिम (सत्ताग्रहण), उडिया- गोपाळकृष्ण रथ (बिपुला डिगांथा), पंजाबी- जसविंदर (अगरबत्ती), राजस्थानी- रामपाल सिंग राजपुरोहित (सुंदर नैन सुधा), संथाली- जमदर किस्कु (माला मुदाम), सिंधी- गोपी कमल (सिजा अज्ञान बुकु), तमिळ- पुमानी (अंगनगदी), तेलगु- रचपालेम चंद्रशेखर रेड्डी (मना नवलालू- मना कथनीकालू) आणि ऊर्दू- मुन्नवर राणा (शहदाबा).
केळेकर यांना पुरस्कार अर्पण
पणजी : आपल्याला जे गवसले ते सुलभ भाषेतून इतरांसमोर मांडताना या साहित्याच्या मननातून संशोधनाच्या वाटेवरून जाण्याची प्रेरणा इतरांनाही मिळावी, हाच हेतू आपण बाळगून आहोत, अशी भावना डॉ. माधवी सरदेसाई यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार कोकणी साहित्याचे भीष्माचार्य रविन्द्र केळेकर यांना अर्पण केला. सरदेसाई यांना या आधी साहित्य अकादमीचा भाषांतराचा पुरस्कारही लाभला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Naralikar Saha Sahitya Akademi Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.