नंदू माधव हिंदी चित्रपटात

By Admin | Updated: November 24, 2014 00:19 IST2014-11-24T00:15:00+5:302014-11-24T00:19:49+5:30

इफ्फीत माहिती : चार्ल्सला पकडणाऱ्या झेंडेची भूमिका

Nandu Madhav in Hindi film | नंदू माधव हिंदी चित्रपटात

नंदू माधव हिंदी चित्रपटात

संदीप आडनाईक - पणजी --ख्यातनाम मराठी अभिनेता नंदू माधव आता हिंदी चित्रपटात एन्ट्री करत आहे. बिकिनी किलर चार्ल्स शोभराज याच्या जीवनावर आधारित मै और चार्ल्स या आंतरराष्ट्रीय चित्रपटात नंदू माधव चार्ल्सला पकडणाऱ्या इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांची भूमिका करत आहे. अभिनेता रणदीप हुडा चार्ल्स शोभराजची मुख्य भूमिका करत आहे. पूजा भट या चित्रपटाची निर्माती असून, पारवल रामन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
४५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गोव्यात आलेल्या नंदू माधव यांनी ही माहिती लोकमतला सांगितली.
चार्ल्स शोभराज हा बिकिनी किलर त्याच्या आयुष्यात एक दंतकथा बनून राहिला होता. ६ एप्रिल १९८६ मध्ये गोव्यात पर्वरी येथे येथील ओ ओकेआ या हॉटेलमध्ये त्याला इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी अटक केली होती. या हॉटेलमध्ये तो असल्याचा सुगावा इन्स्पेक्टर झेंडे यांना लागला होता. आग्री पाडा पोलीस ठाण्यात सेवेत असलेल्या झेंडे यांनी लागलीच गोव्याकडे धाव घेतली. नामांतर करुन उतरलेल्या चार्ल्सला त्याच्या खऱ्या नावानेच हाक मारताच त्याने झेंडे यांच्याकडे पाहिले, आणि तोच खरा चार्ल्स असल्याची खात्री पटताच झेंडे यांनी त्याच्यावर झडप घातली होती. पहाडी आवाज आणि बलदंड शरीरयष्टीच्या झेंडे यांनी १९६४ मध्ये दोनवेळा डॉन हाजी मस्तान यांना तर कुख्यात गुंड करीम लाला यांना पकडले होते. झेंडे यांनी चार्ल्सला दोनवेळा पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता हा सारा इतिहास चित्रपट निर्माते पारवल रामन यांच्या मै और चार्ल्स रसिकांना पहायला मिळणार आहे. पारवल यांनी यापूर्वी रामगोपाल वर्मा यांच्या डरना मना है, डरना जरुरी है, गायब, डार्लिंग, ४0४ एरर नॉट फाउंड या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.


फॅन्ड्रीनंतर येतोय नागराज मंजुळेचा सैराट
फॅन्ड्री या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराट हा चित्रपट दिग्दर्शित करत असून मुंबईच्या एस्सेल व्हिजन या निर्मिती आणि वितरण कंपनीमार्फत त्याची निर्मिती केली जाणार आहे. गोव्यात सुरु असलेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एस्सेल व्हिजन कंपनीचे मराठी चित्रपट विभागाचे प्रमुख निखिल साने यांनी ही माहिती दिली. सैराट ही एक प्रेमकथा असून त्याची केंद्रबिंदू एक समर्पित तरुणी आहे. या चित्रपटाच्या पटकथेवरील काम पूर्ण झाले असून पुढील वर्षापासून चित्रिकरणास प्रारंभ होईल, असे साने म्हणाले. नागराज मंजुळे यांच्या २0१३ मधील फॅन्ड्री या मराठी चित्रपटाने यशाचे शिखर गाठले. या चित्रपटाने मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ज्युरी ग्रॅन्ड पारितोषिक मिळविले होते. नवलाखा आर्टसचे निलेश नवलाखा आणि होली बेसिल प्रॉडक्शनचे विवेक कजारिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.

Web Title: Nandu Madhav in Hindi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.