नंदादीप अखंड तेवत ठेवणारे माऊली!
By Admin | Updated: February 19, 2015 01:56 IST2015-02-19T01:56:53+5:302015-02-19T01:56:53+5:30
दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़

नंदादीप अखंड तेवत ठेवणारे माऊली!
संजय जाधव
ल्ल पैठण (जि़ औरंगाबाद)
दक्षिण भारताची काशी असलेल्या पैठण नगरीतील सर्व मंदिरांमध्ये ४१ वर्षांपासून नंदादीप अखंड तेवत ठेवण्याचे कार्य ७३ वर्षीय लक्ष्मण दामोदर मडके ऊर्फ माऊली यांनी सुरू ठेवले आहे़
मंदिरातील दिव्यांसाठी तेल पुरविता पुरविता लक्ष्मण मडके यांच्या कार्याची दखल घेत पैठणकरांनी त्यांना माऊली ही पदवी बहाल केली आहे. पैठण शहरात शेकडो वर्षांची परंपरा असलेले मंदिरे आहेत. यात ग्रामदैवत असलेले ढोलेश्वर महादेव मंदिर, गाढेश्वर महादेव, सिद्धेश्वर महादेव, पार्वती, सोमनाथ, इंद्रेश्वर, मल्लिनाथ, मुक्तेश्वर, नागनाथ, भैरवनाथ, उत्तरेश्वर, खोलेश्वर, पिंपळेश्वर, संगमेश्वर आदींसह अनेक महादेवांची मंदिरे आहेत. एकवीरा देवी, कालिका मंदिर, चिचाया मंदिर, सप्तमातृका मंदिर, पीठजा मंदिर, शनि भगवान मंदिर आदीसह अनेक शक्ती मंदिरे, गणेश मंदिरे आहेत. यादव काळात पैठणमध्ये शेकडो मंदिरे निर्माण झाली.
यानंतरच्या काळात पैठणने एकनाथ, भानुदास, ज्ञानेश्वर, शिवदिननाथ, कृष्णदयार्णव, अमृतरायजी असे संत दिले. त्यांच्या काळात शहरात अनेक मठ व मंदिरे निर्माण झाली. यातील अनेक मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरात मूर्तीसमोर दिवा लावला जातो तो माऊलींच्या अथक प्रयत्नातूनच.
तेलासाठी फेरी
च्मंदिरातील दिव्यांना तेवत ठेवण्यासाठी तेल लागते़ प्रारंभीच्या काळात लक्ष्मण मडके स्वत:च्या घरून तेल आणून दिवा लावत. हे करता करता शहरातील इतर मंदिरांत दिवा लावावा, अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली; परंतु हे परवडणारे नव्हते.
च्यातून मार्ग काढताना त्यांनी शहरात फिरून यासाठी निधी जमा करण्याचे ठरविले. त्यानुसार आठवड्यातून दोन दिवस फेरी काढून व निधी जमा करून अनेक मंदिरात दिवे लावण्याचे कार्य त्यांनी सफल केले. जसजसा निधी वाढू लागला तशतशी मंदिराची संख्या वाढत गेली. अवघ्या काही दिवसांत त्यांचे हे कार्य समाजमान्य झाले. मंदिरात दिव्यांना तेल पुरवूनही निधी उरत होता.
सन्याशी बुवाने मागितले वचन
लक्ष्मण मडके साधारण तिशीत होते. तेव्हा ते शहराचे ग्रामदैवत ढोलेश्वर मंदिरात नियमित दर्शनासाठी जात असे. तेथे सेवेसाठी काशी येथून वृद्ध सन्यासी शंकरबुवा आलेले होते. त्यांनी लक्ष्मण यांना बोलावून मंदिरात तू जिवंत असेपर्यंत दिवा चालू ठेवशील असे मला वचन दे, असा प्रस्ताव ठेवला. त्यांनी शंकरबुवा या सन्याशाला तत्काळ वचन दिले, ते वर्ष होते १९७४. हे वचन ते आजही पाळत आहेत.