"आपली आर्थिक परिस्थिती आणि आरबीआयची पॉलिसी यात मोठे अंतर आहे. आज जीएसटीचा उत्सव साजरा केला जात आहे, पण हा निर्णय जर पाच वर्षांपूर्वी घेतला असता तर आज उत्सवाची गरजच पडली नसती," अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पाच वर्षांपासून पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे स्पष्ट मत होते की जीएसटीच्या काही टप्प्यांमध्ये चुका आहेत. तरी देखील सरकारने आता तो निर्णय घेतला आहे. उशिरा का होईना, घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायलाच हवेत, असे त्या म्हणाल्या.
आमदार नसताना २० कोटी निधी मिळतो या शिवसेनेच्या नेत्याच्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. असे प्रकार घडत असतील तर त्याचे उत्तर महाराष्ट्र सरकारने द्यायलाच हवे. देशाचे पंतप्रधान शपथ घेतल्यानंतर एका भाषणात म्हणाले होते की ते या देशाचे ‘प्रधान सेवक’ आहेत. पण जर असे घडत असेल तर महाराष्ट्राचे सरकार नरेंद्र मोदींचेही ऐकत नाही, असे दिसते, असे त्या म्हणाल्या.
तसेच राज्यातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणींची नावे सरकारने कमी केली आहेत. या योजनेत सुमारे चार हजार 900 कोटी रुपयांचा महाभ्रष्टाचार झाल्याचे सरकारच्या आकडेवारीतूनच स्पष्ट होत असल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पैसे पुरुषांनी काढले असे सांगितले जाते, पण हे पैसे गेले कुठे याचे उत्तर सरकारने द्यायलाच हवे, अशीही मागणी सुळे यांनी केली.