नाम संस्था; नव्हे चळवळ

By Admin | Updated: August 29, 2016 03:41 IST2016-08-29T03:41:54+5:302016-08-29T03:41:54+5:30

नाम फाउंडेशनने कोरड्या पडलेल्या जमिनीलाच नव्हे तर कोरड्या होत चाललेल्या माणुसकीला पाझर फोडला आहे. समाजाकडून आपण शेतकऱ्यांचे ऋण फेडत आहोत

Name organization; Not movement | नाम संस्था; नव्हे चळवळ

नाम संस्था; नव्हे चळवळ

पुणे : नाम फाउंडेशनने कोरड्या पडलेल्या जमिनीलाच नव्हे तर कोरड्या होत चाललेल्या माणुसकीला पाझर फोडला आहे. समाजाकडून आपण शेतकऱ्यांचे ऋण फेडत आहोत. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी बीज रोपण केलेली नाम फाउंडेशन ही केवळ संस्था राहिलेली नसून महाराष्ट्रभर एक चळवळ म्हणून विस्तारत आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.
माहेर प्रतिष्ठानतर्फे कॉ. के. आर. पाटील व सुनंदा पाटील स्मृतीप्रीत्यर्थ नाम फाउंडेशनला कृष्णानंद पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. केसरीवाडा येथे झालेल्या कार्यक्रमात फाउंडेशनच्या परभणी विभागाचे समन्वयक कांतराव देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा विद्या म्हात्रे, भोई प्रतिष्ठानचे मिलिंद भोई, उद्योगपती विठ्ठल मणियार, एकनाथ पाटील, गुरुनाथ पंडित, मीना नाईक उपस्थित होते.
माशेलकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र विद्या, कला, उद्योग, मूल्ये आदी क्षेत्रात पहिला असावा. पण महाराष्ट्रात दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बघितले तर त्यातही महाराष्ट्र अव्वल आहे, हे चिंताजनक आहे. लोकमान्य टिळक शंभर वर्षांपूर्वी स्वराज्यासाठी लढत होते. आज आपण सुराज्यासाठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे.’’
धनराज साठे यांनी पालकत्व घेतलेल्या ५० पोतराजांच्या मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच सिने कलाकार मिहीर सोनी, प्राजक्ता गायकवाड, पार्थ भालेराव, ऋतुजा जुन्नरकर, वैष्णवी पाटील यांनी मुलांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘जगणे हीच सुंदर कविता आहे. ग्लॅमर असलेल्या चित्रपट जगतातील लोक महागड्या वाहनांतून येतात. फोटो काढतात, सह्या देतात. हेच त्यांना सुंदर आयुष्य वाटते. पण येथे सामान्य चेहरे पाहिले, की आतून समाधान वाटते. काही अपंग मुलांना पालक आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण देत असतात, तेव्हा तेच पालक व शिक्षक मोठे समाजकार्य करत असतात. आज आपण राजकारण, व्यसन, जात, पंथ, रूप, यात अडकून पडलो आहोत. पण समाजाला पाण्याच्या क्रांतीचा, हरित क्रांतीची व स्नेहाच्या क्रांतीची गरज आहे.
कांतराव देशमुख म्हणाले, ‘‘नाम फाउंडेशनला जोडल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. माझे सामाजिक काम पाहून नाना व मकरंद यांनी मला या कार्यात जोडून घेतले. मराठवाड्यात ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या मोहिमेतून ५७० किमी लांबीचे ओढे, नाले खोदले. मराठवाड्यातील लेनी नावाचा एक ओहळ होता त्या ओहळाचे खोलीकरण केले. त्यामुळे ती ओहळ गावची जीवनदायीनी झाली. लोकांनी तिचे ‘नाम नदी’ असे नामकरण केले.’’

Web Title: Name organization; Not movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.