स्वस्त घराच्या नावाखाली गंडा

By Admin | Updated: May 18, 2016 05:20 IST2016-05-18T05:20:00+5:302016-05-18T05:20:00+5:30

म्हाडामध्ये स्वस्तात घरे मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या ठगाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली.

In the name of cheap house | स्वस्त घराच्या नावाखाली गंडा

स्वस्त घराच्या नावाखाली गंडा


मुंबई : म्हाडामध्ये स्वस्तात घरे मिळवून देण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घालणाऱ्या ठगाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. हिंदुराव शेजवळ (३८) असे अटक आरोपीचे नाव असून, म्हाडा अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याची बतावणी तो करत होता. यामध्ये म्हाडा अधिकाऱ्यांचादेखील सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, घाटकोपर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
मूळचा सातारा येथील रहिवासी असलेला शेजवळ गेल्या काही दिवसांपासून विक्रोळी परिसरात राहत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याची ओळख घाटकोपर परिसरात राहणारे दादासाहेब कांबळे यांच्याशी झाली. आरोपीने त्यांना आपली म्हाडामध्ये चांगली ओळख असून, तुम्हाला स्वस्तात घर मिळवून देतो, असे सांगितले. मुंबईसारख्या शहरात स्वस्तात हक्काचे घर मिळत असल्याने कांबळेंनी त्याला होकार दिला. त्यानुसार, सुरुवातीला शेजवळने त्यांच्याकडून साडेआठ लाख रुपये घेतले. अनेक महिने उलटूनही घर मिळत नसल्याने त्यांनी शेजवळकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. आरोपीकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने, यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे कांबळे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ घाटकोपर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत घाटकोपर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.
शेजवळ विद्याविहार येथील गोल्डन पॅलेस हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीत या आरोपीने अशाच प्रकारे आठ ते दहा जणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची कबुली दिली आहे. यामध्ये म्हाडा अधिकाऱ्यांचादेखील समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the name of cheap house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.