पावसाळ्यापूर्वी नालेसफाई
By Admin | Updated: May 15, 2015 02:11 IST2015-05-15T02:11:56+5:302015-05-15T02:11:56+5:30
महापालिका ज्या गतीने नालेसफाईचे काम करीत आहे ती गती बघितल्यानंतर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई महापालिका निश्चितच

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई
मुंबई : महापालिका ज्या गतीने नालेसफाईचे काम करीत आहे ती गती बघितल्यानंतर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई महापालिका निश्चितच पूर्ण करेल, असा आशावाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या नालेसफाई कामांची महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्यासमवेत गुरुवारी संयुक्त पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.
गत १० वर्षांपासून महापालिका अत्यंत चांगले काम करीत असून, मुंबईत कुठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता महापालिका घेईल. पम्पिंग स्टेशनची कामे जोरात सुरू असून क्लिव्हलॅण्ड बंदर आणि लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन येत्या पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित करण्यात येणार आहे. उर्वरित पम्पिंग स्टेशनची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत.
लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशनमुळे मौलाना आझाद रोड, जमशेटजी जीजीभॉय रोड, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग, डॉ. दादासाहेब भडकमकर रोड, परशुराम पुप्पाला रोड, आर.एस. निमकर मार्ग, डॉ. आनंदराव नायर रोड, एन.एम. जोशी मार्ग, बी.डी.डी. चाळी, डॉ. ई. मोझेस रोड, साने गुरुजी मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. अॅनी बेझंट रोड या ठिकाणी पाण्याचा निचरा होणार आहे. त्याचबरोबर क्लिव्हलॅण्ड बंदर पम्पिंग स्टेशनमुळे दादर मार्केट, दादर रेल्वे स्थानक, भवानी शंकर रोड, म्हात्रे पेन वर्क्स, दादर सिवरेज आॅपरेशन्स सेंटर, फितवाला लेन, सनमिल लेन, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, ड्रेनेज चॅनेल रोड, एन.एम. जोशी मार्ग, शंकरराव नरम मार्ग, शिवराम अमृतवार मार्ग, दादासाहेब फाळके मार्ग, सेनापती बापट मार्ग या विभागांतील पाण्याचा निचरा होणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी २ टर्मिनलजवळील लेलेवाडी नाला, कुर्ला टर्मिनस व रेल्वे क्वॉटर्सच्या जवळील कारशेड नाला, बी.के.सी. १ इमारतीजवळील एम.टी.एन.एल. पूल, आय.एल.एफ.एस. इमारतीजवळील प्रेमनगर पातमुख आदी नाल्यांची पाहणी या वेळी करण्यात आली.
दरम्यान, काळबादेवी परिसरातील गोकूळ हाउस या इमारतीला लागलेल्या भीषण आगीप्रसंगी तेथील रहिवाशांचे जीव वाचविताना व कर्तव्य पार पाडताना गंभीर जखमी झालेले मुंबई अग्निशमन दलातील उप अग्निशमन अधिकारी सुधीर अमिन यांचे निधन झाल्याने उर्वरित नालेसफाई कामाचा पाहणी दौरा रद्द करण्यात आला. (प्रतिनिधी)