विना शस्त्रक्रिया फुफ्फुसातून काढला खिळा
By Admin | Updated: June 11, 2017 13:49 IST2017-06-11T13:49:19+5:302017-06-11T13:49:19+5:30
एका मजुराने नकळत एक खिळा गिळला. हा खिळा फुफ्फुसाच्या खालच्या भागात अरुंद जागी रुतून बसला.

विना शस्त्रक्रिया फुफ्फुसातून काढला खिळा
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 - खिळे ठोकताना नेहमीच्या सवयीनुसार तोंडात खिळे पकडून ठेवलेल्या एका मजुराने नकळत एक खिळा गिळला. हा खिळा फुफ्फुसाच्या खालच्या भागात अरुंद जागी रुतून बसला. या ठिकाणी ब्रॉन्कोस्कोपीही पोहचत नव्हती. शस्त्रक्रिया करून फुफ्फुसाचा तेवढा भाग कापून फेकणे हा एकच पर्याय शिल्लक होता, परंतु यात रुग्णाच्या जिवाला धोका होता. मात्र डॉ. अशोक अरबट यांनी आपला अनुभव व कौशल्याच्या बळावर फ्लयूरोस्कोपी व ब्रोन्कोस्कोपीच्या मदतीने विना शस्त्रक्रिया हा खिळा अलगद बाहेर काढून रुग्णाचे प्राण वाचविले.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील ४५ वर्षीय गजाजन हे नेहमीप्रमाणे एका लग्नाच्या डेकोरेशनचे काम करीत होते. काही उंचीवर पडदा लावण्यासाठी खिळे ठोकत असताना तोंडात तीन-चार खिळे पकडून ठेवले होते. नकळत एक लोखंडी खिळा त्यांनी गिळला. याची माहिती त्यांनी आपल्या सहकाऱ्याला दिली. त्याने केळी खाण्याचा सल्ला दिला. गजानन यांनी केळी खाऊन त्या दिवशीचे आपले काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी याची माहिती आपल्या कॉन्ट्रॅक्टरला दिली. लगेच इस्पितळात जाण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी छातीचा एक्स-रे काढला. यात खिळा उजव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागात रुतून बसला होता. गजानन यांना लागलीच रामदासपेठ येथील क्रिम्स हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. ३ जून रोजी ते इस्पितळात दाखल होताच वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट यांनी तपासून छातीचा सिटी स्कॅन करून घेतला. यात हा टोकदार खिळा हृदयाच्या खालच्या बाजूला फुफ्फुसात असल्याचे आढळून आले.
-ब्रॉन्कोस्कोपीचा पर्याय निवडला
या विषयी अधिक माहिती देताना इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. समीर अरबट म्हणाले, हा खिळा बाहेर काढण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपीची मदत घेणे किंवा फुफ्फुसाचा तेवढा तुकडा शस्त्रक्रियाद्वारे कापणे हे दोनच पर्याय होते. यात उशीर केल्यास लोखंडी टोकदार खिळ्याचे इन्फेक्शन पसरण्याचे व तिथे जखम होऊन गुंतागुंत वाढण्याची शक्यता होती. यामुळे तत्काळ निर्णय घेणे आवश्यक होते. शस्त्रक्रिया ही रुग्णासाठी खर्चिक व धोकादायक होती. म्हणून डॉ. अशोक अरबट यांनी ब्रॉन्कोस्कोपीच्या मदतीने खिळा बाहेर काढण्याचा पर्याय निवडला.
-फ्लयूरोस्कोपीची घेतली मदत
शस्त्रक्रिया गृहात गजानन यांच्या नाकावाटे श्वसनलिकेमधून ब्रॉन्कोस्कोपी टाकण्यात आली. परंतु खिळा अरुंद जागी रुतून बसला होता. त्या ठिकाणी ब्रॉन्कोस्कोपी पोहचत नव्हती. खिळाही दिसत नव्हता. यामुळे फ्लयूरोस्कोपीची मदत घेतली. खिळा नेमका कुठे आहे याचे चित्र स्क्रिनवर दिसत होते. एका दुसऱ्या यंत्राच्या मदतीने खिळ्याजवळ पोहचता आले. परंतु खिळ्याला वरची कॅप नव्हती, यामुळे चिमट्यात तो बसत नव्हता. शिवाय, पकडल्यानंतर सुटल्यास त्याच्या टोकामुळे श्वसननलिका फाटण्याची भीती होती. त्या परिस्थितीतही अनुभव व कौशल्याच्या बळावर डॉ. अरबट यांनी अलगद खिळा बाहेर काढला. दोन दिवसांत तो मजूर रुग्ण आपल्या घरीही जाऊ शकला.