नागपुरी संत्रा रस्त्यावर
By Admin | Updated: November 17, 2014 01:05 IST2014-11-17T01:05:12+5:302014-11-17T01:05:12+5:30
देशातील इतर भागांच्या तुलनेत नागपूरची संत्री गोड आणि दर्जेदार असून, जगभरात लोकप्रिय आहेत. संत्रा हे विदर्भातील प्रमुख फळपीक असताना त्याच्या विपणन व ब्रँडिंगकडे शासाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

नागपुरी संत्रा रस्त्यावर
उत्पादन जास्त पण भाव नाही : ब्रँडिंगकडे शासनाचे दुर्लक्ष
नागपूर : देशातील इतर भागांच्या तुलनेत नागपूरची संत्री गोड आणि दर्जेदार असून, जगभरात लोकप्रिय आहेत. संत्रा हे विदर्भातील प्रमुख फळपीक असताना त्याच्या विपणन व ब्रँडिंगकडे शासाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यंदा संत्र्याचा आंबिया बार मोठ्या प्रमाणात आल्याने व बाजारपेठेत हवी ती किंमत न मिळाल्याने नागपुरातील रस्त्यांवर बसून संत्र्यांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
काटोल परिसरातील शेतकरी संतोष आंबिलवादे हे आज टाटा एस गाडीने कळमना येथे यंत्रा विकायला घेऊन गेले. पण रविवारमुळे मार्केट बंद होते. व्यापारी संत्रा घेतील, अशी त्यांना अपेक्षा होती. एका व्यापाऱ्याने माल घेण्याची तयारीही दाखविली. पण भाव खूप पडका दिला. त्यामुळे संतोष हे तेथून संत्रा परत घेऊन निघाले. गर्दीच्या सक्करदरा चौकाच्या बाजूला त्यांनी रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली व रस्त्यावरच संत्रा विक्रीस सुरुवात केली. सध्या असेच काहीसे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसोबत घडत आहे. नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला संत्र्याचे ढीग विक्रीसाठी लागलेले पहायला मिळत आहे. शेतकरी ३० ते ६० रुपये झडन या भावाने ग्राहक मिळेल तशी संत्र्याची विक्री करीत आहेत. दिवसभरात संत्रा विकला गेला नाही तर काही शेतकरी रात्र फुटपाथवर काढून दुसऱ्या दिवशी उरलेली संत्री विकत आहेत, तर काही शेतकरी उरलेली संत्री घेऊन गावी परतत आहेत. संत्र्याचे उत्पादन राजस्थान आणि पंजाब राज्यात होत असले तरीही आंबट-गोड चव आणि सुगंधामुळे नागपुरी संत्र्याला भारतात सर्वत्र मागणी आहे. पोषक जमीन आणि पाणी हे मुख्य कारण आहे. राजस्थान आणि पंजाब येथील संत्र्यांची चव कडवट आहे. हा संत्रा दिल्ली भागात केवळ ज्यूससाठी वापरला जातो. याउलट नागपुरी संत्रा ‘टेबल फ्रूट’ मानले जाते. नागपुरातून भारतात सर्वत्र आणि काठमांडूपर्यंत संत्रा पाठविला जातो. आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनेच संत्र्यांची विक्री करण्यात येत आहे. उत्पादन कमी वा जास्त झाले तरीही जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी दरवर्षीच थोडाफार संत्रा रस्त्याच्या कडेला विक्री करीत असल्याचे चित्र आहे. विक्री व्यवस्थापनात बदल केल्यास संत्रा उत्पादकांना निश्चितच फायदा होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
पॅकिंग आणि प्रक्रिया कारखाने सुरू करा
शासनाच्या कुचकामी धोरणामुळे नागपूर जिल्ह्यातील बंद असलेल्या प्रक्रिया आणि पॅकिंग कारखान्यांमुळे शेतकऱ्यांवर रस्त्यांवर संत्रे विकण्याची किंवा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये आवक वाढल्याचे किंवा दिल्लीत थंडी वाढल्याचे कारण पुढे करून संत्र्याचे भाव जाणीवपूर्वक पाडले जातात. पूर्वी २५ ते ३० हजार रुपये टन असा भाव मिळालेल्या शेतकऱ्यांना जेव्हा १० हजार रुपये टन असा भाव मिळतो, तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरतो. काटोल येथील १२ कोटींचा प्रक्रिया कारखाना ८ कोटींचा मोर्शी येथील आणि ८ कोटींचा कारंजा येथील पॅकिंग कारखाना धूळखात आहे. त्याकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे. सध्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात १ लाख ३५ हजार हेक्टरवर ४ लाख संत्र्यांची झाडे आहेत. जास्त उत्पादन होणाऱ्या नागपुरी संत्र्याला सर्वाधिक मागणी आहे. पण स्थानिक भागात त्यावर प्रक्रिया करून अधिक रुपये मिळवून देणारे उद्योग प्रशासकीय यंत्रणेच्या तावडीत सापडल्याने संत्र्याचा कोळसा झाला आहे. हिवाळी अधिवेशनात पॅकेज द्यावे, अशी मागणी माजी आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.