नागपूर : तरुणीचे अपहरण करून बलात्कार
By Admin | Updated: October 17, 2016 16:30 IST2016-10-17T16:30:38+5:302016-10-17T16:30:38+5:30
पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार करणा-या नितीन उके (वय ३५) तसेच घटनेची माहिती दडवून ठेवणा-या चंढ्या नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नागपूर : तरुणीचे अपहरण करून बलात्कार
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १७ : वस्तीतील तरुणीचे अपहरण करून एका आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तर आरोपीने शंभर रुपये दिले म्हणून तरुणीला मदत करण्याऐवजी दुस-या एकाने या गंभीर गुन्ह्याची माहिती उघड न करता आरोपीला मदत केल्याचा संतापजनक प्रकार जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी अपहरण आणि बलात्कार करणा-या नितीन उके (वय ३५) तसेच घटनेची माहिती दडवून ठेवणा-या चंढ्या नामक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पीडित तरुणी (वय १९) हिला आरोपी नितीन उके याने १५ आॅक्टोबरच्या रात्री ९.३० वाजता जबरदस्तीने आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला सुरादेवी गावाच्या जंगलाकडे नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपी बलात्कार करण्याच्या उद्देशाने तरुणीला मोटरसायकलवर बसवून नेत असल्याची बाब चंढ्या नामक दुस-या एका आरोपीच्या ध्यानात आली. त्यामुळे त्याने आरोपी नितीन उकेची मोटरसायकल थांबवली.
मात्र, नितीनने त्याला १०० रुपये आणि मोबाईल देताच आरोपी चंढ्या गप्प बसला. चंढ्याने ही बाब लगेच तरुणीच्या आईवडीलांना किंवा पोलिसांना कळवली असती तर बलात्काराचा गुन्हा रोखता आला असता. मात्र, चंढ्याने तसे केले नाही. मध्यरात्रीनंतर आरोपी नितीनने पीडित तरुणीला वस्तीत आणून सोडले. घटनेची माहीती आईवडीलांना सांगीतली तर जीवे मारेन, अशी धमकीसुद्धा दिली.
दरम्यान, मुलगी बराच वेळपासून घरून निघून गेल्यानंतर मध्यरात्री परत आल्याचे पाहून पालकांनी तिला विचारणा केली. त्यानंतर हा गुन्हा उजेडात आला. कशीबशी रात्र काढल्यानंतर पालकांनी रविवारी दुपारी शेजारच्या व्यक्तींना ही माहिती दिली. त्यानंतर जरीपटका पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक डोंगरे यांनी अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तर, हा गुन्हा घडण्यास चंढ्यासुद्धा कारणीभूत असल्याचे तरुणीच्या बयानातून पुढे आल्याने त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.
आरोपी फरार
अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे कळताच मुख्य आरोपी नितीन उके फरार झाला. पीडित तरुणी त्याला ओळखते. मात्र, चंढ्याला केवळ चेह-याने ओळखते. त्यामुळे उकेला अटक झाल्यानंतरच चंढ्या कोण आहे, कुठे राहतो, ते स्पष्ट होईल. त्यानंतरच त्याला अटक करण्यात येईल, असे जरीपटका पोलीस सांगतात.