नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या लष्करी जवानाने ३० जणांना उडवल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास नगरधन गावात घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जवानाला पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले. कारवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
हर्षपाल महादेव वाघमारे (वय, ४०) असे जवानाचे नाव असून ते आसाममध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्यात सेवारत अधिकारी आहे. शिवाय, ते चार दिवसांपूर्वीच सुट्टीवर गावात आले आहेत, असे देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हर्षपाल हे मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असताना रामटेक तालुक्यातील नगरधन परिसरात त्यांचे नियंत्रण सुटले आणि त्यांनी पादचाऱ्यांना धडक दिली. या धडकेत अनेकजण खाली पडले आणि जखमी झाले.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी हर्षपाल यांचा पाठलाग केला. काही अंतरावर जाऊन हर्षपाल यांची कार नाल्यात पलटी झाली. गावकऱ्यांनी हर्षपाल यांना पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. जमावाने केलेल्या मारहाणीत हर्षपाल किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.