दहशतवादी हल्ल्याच्या सूचनेने नागपूरचे पोलीस हादरले
By Admin | Updated: August 17, 2016 23:47 IST2016-08-17T23:47:52+5:302016-08-17T23:47:52+5:30
दहशतवादी मॉल्सवर हल्ला करणार असल्याच्या बातमीने बुधवारी रात्री पोलिसांची झोप उडाली. पोलिसांनी रात्री विशेष आॅपरेशन चालवून सीताबर्डी येथील मॉल्सची घेराबंदी करून तपासणी करण्यात आली

दहशतवादी हल्ल्याच्या सूचनेने नागपूरचे पोलीस हादरले
सीताबर्डी येथील मॉल्सची तपासणी
नागपूर : दहशतवादी मॉल्सवर हल्ला करणार असल्याच्या बातमीने बुधवारी रात्री पोलिसांची झोप उडाली. पोलिसांनी रात्री विशेष आॅपरेशन चालवून सीताबर्डी येथील मॉल्सची घेराबंदी करून तपासणी करण्यात आली. सुमारे तीन तास अतिशय गोपनीय पद्धतीने चालविण्यात आलेल्या या आॅपरेशनमध्ये पोलिसांच्या हाती काहीही सापडले नाही.
देशातील गुप्तचर संस्थांनी १५ आॅगस्ट दरम्यान दहशतवाद्याकडून उपराजधानीसह राज्यातील महत्त्वपूर्ण शहरांवर हल्ला होण्याची इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक सतर्क होते. पोलिसांनी आठवडाभरापासूनच नाकाबंदी आणि संशयास्पद व्यक्तींची धरपकड सुरू केली होती. सुत्रांनुसार बुधवारी रात्री पोलिसांना एका कारमध्ये दोन संदिग्ध व्यक्ती स्वार असल्याची सूचना मिळाली. त्या दोघांजवळ मॉल आणि त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा नकाशा असल्याचीही माहिती मिळाली. ते सीताबर्डीच्या मॉल्सकडे गेल्याच्या शक्यतेने पोलीस कामाला लागले.
तडकाफडकी झोन दोनचे डीसीपी रवींद्र सिंह परदेशी, सीताबर्डीचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार हे आपल्या ताफ्यासह सीताबर्डी परिसरातील तिन्ही मॉल्सवर पोहोचले. त्यांनी पार्क केलेल्या सर्व वाहनांची तपासणी केली. एकेक वाहनांना तेथून रवाना केले. तीन तास चाललेल्या या तपासात कुठलीही संदिग्ध वस्तू किंवा हालचाल आढळून आली नाही.
१२ आॅगस्ट रोजी सुद्धा याच प्रकारे एमआयडीसी आणि अमरावती रोडवर काही लोकं पॅराशूटने उतरल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पोलीस व वायुसेनेच्या अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले होते. पोलिसांनी फुटाळा जंगलाची घेराबंदी केली होती तर वायुसेनेने आकाशातून पाहणी केली होती.