नागपूर-नागभीड प्रकल्प मार्गी लागणार!
By Admin | Updated: January 21, 2015 00:21 IST2015-01-21T00:21:07+5:302015-01-21T00:21:07+5:30
रेल्वेतील विकास कामांना गती मिळावी, प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हेतूने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आलोक कंसल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची

नागपूर-नागभीड प्रकल्प मार्गी लागणार!
निधीची मागणी : आलोक कंसल यांनी घेतली गडकरींची भेट
नागपूर : रेल्वेतील विकास कामांना गती मिळावी, प्रवाशांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हेतूने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक आलोक कंसल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी छोट्या रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी खासदार निधीतून मदत करण्याचे तसेच नागपूर-नागभीड ब्रॉडगेज प्रकल्पाकडे लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन गडकरींनी दिल्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागपूर-नागभीड या १०६ कि.मी. अंतराच्या नॅरोगेज मार्गाला गत रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळून ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर-नागभीड हा एकमेव नॅरोगेज मार्ग आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन १८८.११ कोटींचा निधी केंद्राला देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकल्पाला जवळपास ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. योजना आयोग व कॅबिनेट कमिटी इकॉनॉमिकल अफेअर्सची अद्याप या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही. अलीकडेच नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाचा प्रस्ताव विद्युतीकरणासह नव्याने पाठविण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कामांची दिशा निश्चित केली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सविस्तर माहिती कंसल यांनी नितीन गडकरींना दिली. यासोबतच नागपूर-कळमना डबलिंगबाबत चर्चा झाली. नागपूर-कळमना या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला चार वर्षापूर्वीच मान्यता मिळाली आहे.
२५ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती कंसल यांनी दिली. यावर राज्य सरकार तसेच महापौरांशी बोलून प्रयत्न करण्याचे आश्वासन गडकरींनी दिले. इतवारी, कळमना, कामठी आणि कन्हान रेल्वेस्थानकावर गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी लाकडी किंवा सिमेंटचे बेंच बसविण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. २०१०-२०११ या वर्षात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात प्रशिक्षण घेतलेले ३२ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण संपताच बेरोजगार झाले. यावर चीफ मेकॅनिकल इंजिनिअर आणि रेल्वे महाव्यवस्थापकांशी चर्चा करण्याचे आश्वासन गडकरींनी दिले. याप्रसंगी रेल्वे ओबीसी फेडरेशनचे महासचिव मनोज समर्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)