नागपूर मेट्रो रेल्वेला बुस्ट !
By Admin | Updated: March 21, 2015 01:32 IST2015-03-21T01:32:46+5:302015-03-21T01:32:46+5:30
उपराजधानी नागपूरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असलेला आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी लाभकारक ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे गती मिळाली आहे.

नागपूर मेट्रो रेल्वेला बुस्ट !
नागपूर : उपराजधानी नागपूरच्या विकासात महत्त्वाचा टप्पा असलेला आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी लाभकारक ठरणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र आणि राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे गती मिळाली आहे. २२ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोच्या संकेतस्थळाचे उद््घाटन होणार असून, २६ मार्चला या प्रकल्पाला कर्ज पुरवठा करणाऱ्या फ्रान्स कंपनीचा चमू नागपुरात दाखल होत आहे.
सुमारे ८६०० कोटी रुपयांच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला फ्रान्स सरकारची विकास कंपनी (एएफडी) १५०० कोटींचे (२०० दशलक्ष युरो) कर्ज देणार आहे. या कंपनीच्या अधिकाऱ्यांचा चमू २६ मार्चपासून तीन दिवसांच्या दौऱ्यावर नागपूरला येत आहे, असे नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सांगितले. २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू झाले आहे. बुधवारी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी १९७.६५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
संकेतस्थळाचे रविवारी उद््घाटन
दरम्यान रविवारी २२ मार्च रोजी मेट्रोच्या संकेतस्थळाचे उद््घाटन होणार असून या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, असे दीक्षित म्हणाले. या संकेतस्थळावर प्रकल्प आणि विकास कामांची अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.