नागपूर : लाचखोर महिला पोलीस हवलदार जेरबंद
By Admin | Updated: September 19, 2016 21:03 IST2016-09-19T21:03:46+5:302016-09-19T21:03:46+5:30
तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी साडेपाच हजारांची लाच मागणारी कळमन्यातील महिला पोलीस हवलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकली.

नागपूर : लाचखोर महिला पोलीस हवलदार जेरबंद
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १९ : तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी साडेपाच हजारांची लाच मागणारी कळमन्यातील महिला पोलीस हवलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकली. मनिषा अरूण साखरकर (वय ४८) असे तिचे नाव आहे.
फिर्यादी संतोषराव पोहणकर मुळचे जबलपूरचे असून सध्या ते कळमन्यात राहतात. त्यांची पीठाची चक्की आहे.
पत्नी आणि तिच्या नातेवाईकांसोबत पोहणकर यांचा वाद सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून त्यांनी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारअर्जाची चौकशी हवलदार मनिषा साखरकर हिच्याकडे होती. तिने पोहणकर यांच्याशी संपर्क साधून ५५०० रुपये दिले तरच गैरअर्जदारांवर कारवाई करेन, अशी अट घातली. लाच दिल्याशिवाय कारवाई होणार नाही, असेही बजावले. आधीच त्रस्त असलेल्या पोहणकर यांच्याकडे साखरकर हिने लाचेच्या पैश्यासाठी तगादा लावला. त्यामुळे पोहणकर यांनी एसीबीचे अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे धाव घेतली.
त्यांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दराडे यांनी सापळा लावण्याचे निर्देश दिले. ठरल्याप्रमाणे एका पंचासह पोहणकर साखरकर हिच्याकडे गेले. साडेपाच हजार एकमुश्त देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा साखरकर हिने आज तीन हजार द्या, नंतर अडीच हजार द्या, असे सांगितले. त्यानुसार, पोहणकर लाचेचे तीन हजार आणि एसीबीच्या अधिकारी, कर्मचा-यांसह सोमवारी दुपारी १.३० वाजता कळमना ठाण्यात गेले.
साखरकर हिने पोहणकरला ठाण्याबाहेर थांबण्याचा ईशारा केला अन् लगबगीने लाच घेण्यासाठी पोहचली. तिने लाचेची रक्कम स्विकारताच बाजुलाच दबा धरून असलेल्या एसीबीच्या पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, भावना धुमाळे, शुभांगी देशमुख, पोलीस शिपाई राजेंद्र जाधव, दिप्ती मोटघरे, शालीनी जांभूळकर, परसराम साही यांनी ही कामगिरी बजावली.
लाचखोरीसाठी चर्चित
एसीबीने लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडलेली मनिषा साखरकर ही महिला पोलीस कर्मचारी कळमना ठाण्यात लाचखोरीसाठी चर्चित होती. तिच्याकडे आलेल्या तक्रार अर्जाशी संबंधित (फिर्यादी आणि आरोप) व्यक्तींना लाचेसाठी अक्षरश: धारेवर धरायची. सहा महिन्यांपूर्वी तिने अशाच प्रकारे एका गरिब तरुणाला पैश्यासाठी लग्न करण्यास नकार दिल्याच्या आरोपावरून कारवाईची धमकी दिली होती. त्याच्याकडून चिरीमिरी उकळण्यासाठी तिने त्याला प्रचंड मानसिक त्रास दिला होता.