नागपूर @ 5.00
By Admin | Updated: December 30, 2014 01:01 IST2014-12-30T01:01:10+5:302014-12-30T01:01:10+5:30
उत्तरेकडील राज्यांतील गारठ्याचा विदर्भातील तापमानावरदेखील परिणाम होत असून, सोमवारी नागपुरात चक्क ५.० अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली.

नागपूर @ 5.00
४५ वर्षांतील ‘रेकॉर्डब्रेक’ थंडी
नागपूर : उत्तरेकडील राज्यांतील गारठ्याचा विदर्भातील तापमानावरदेखील परिणाम होत असून, सोमवारी नागपुरात चक्क ५.० अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. याअगोदर बरोबर ४५ वर्षांपूर्वी २९ डिसेंबर १९६८ रोजी उपराजधानीत ५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. सोमवारच्या थंडीने हा ‘रेकॉर्ड’देखील मोडित काढला.
यंदा उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे व त्याचा परिणाम येथील वातावरणावर होत आहे. गेल्या तीन दिवसांत नागपुरातील पारा घसरणीला लागला आहे, अशी माहिती सहायक हवामान वैज्ञानिक ए.एस.खान यांनी दिली.
सोमवारी सकाळच्या सुमारास उपराजधानीवर धुक्याचे पांघरुण होते. भरदुपारी थंडावा जाणवून येत होता. शिवाय विदर्भातील अनेक ठिकाणी थंडीची तीव्रता जाणवली. वर्धा, यवतमाळ, अकोला येथे पारा ७ ते ८ अंशापर्यंत उतरला होता. वातावरणात शुष्कता असल्याने पाऱ्यात घसरण कायम राहून विदर्भाच्या काही भागात शीतलहर कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.